मदत मागणाऱ्यांमध्ये ५३ टक्के व्यक्ती २६ ते ४० वयोगटातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि ‘एमपॉवर’च्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२० मध्ये चोवीस तास कार्यरत असणारी मानसिक आरोग्यविषयक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. कोरोनानंतर उद्भवलेल्या मानसिक समस्यांचे ‘हेल्पलाइन ब्रेकडाऊन’वरून आकलन होत आहे. मदत मागणाऱ्यांमध्ये ५३ टक्के व्यक्ती २६ ते ४० वयोगटातील आहेत.
सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रमुख मानसिक समस्यांमध्ये चिंता व तणाव यांचे प्रमाण जास्त आहे. हेल्पलाइनला आलेल्या कॉल्समध्ये या तक्रारींचे प्रमाण २५ टक्के आहे. प्रामुख्याने करिअरशी संबंधित प्रश्न, कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या, कोविडच्या आजाराला बळी पडण्याचा धोका, आरोग्याचे प्रश्न आणि परीक्षांचा ताण यांच्याशी संबंधित या चिंता आहेत. १० टक्के कॉल हे उदासीनता, ढासळलेली मानसिकता, दु:खाची भावना आणि नैराश्य यासंबंधी होते. ८ टक्के कॉल नातेसंबंधांविषयी होते. हे कॉल करणाऱ्या व्यक्ती आपले भागीदार किंवा कुटुंबातील सदस्यांबाबत चिंताग्रस्त होते. शेतकरी, शिक्षक, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व स्तरातील लोकांना प्रशिक्षित आणि अनुभवी मानसिक आरोग्य समुपदेशकांची मदत हवी होती.
* पुरुष व्यक्त हाेत नाहीत हा समज ठरला चुकीचा!
हेल्पलाइनवर कॉल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ७० टक्के, तर महिलांचे ३० टक्के आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष स्वतःला जास्त व्यक्त करीत नाहीत, हा समज यामुळे दूर होत असल्याचे दिसून येते. हेल्पलाइनवर कॉल करणारे १८ ते ८५ अशा सर्व वयोगटातील असले, तरी त्यातील बहुतांश व्यक्ती २६ ते ४० वर्षे वयोगटातील होत्या. त्यांचे प्रमाण ५३ टक्के होते. तसेच १८ ते २५ वर्षे या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण २८ टक्के होते. ५५ वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींचे प्रमाण सर्वात कमी, म्हणजे ५ टक्के होते.
अन्य राज्यांतूनही मदतीची हाक
या हेल्पलाइनवर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि सोलापूर या शहरांमधून मोठ्या प्रमाणात कॉल आले. हेल्पलाइन सुरुवातीला राज्यामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आली असली, तरी दिल्ली, कोलकाता, लखनऊ आणि बंगळुरूसह देशातील इतर शहरांमधूनही त्यावर कॉल आले, अशा नोंदी आहेत.
संवाद साधा, मोकळे व्हा
गेल्या वर्षभराचा काळ कोविडमुळे सर्वांसाठी कठीण गेला, अगदी लहानग्यांनाही मानसिक आराेग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने तशीच परिस्थिती उद्भवली आहे. अशा काळात कुटुंबापासून ते व्यवसाय, नोकरी, नातेसंबंधांपर्यंत सर्वांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा वेळेस आपल्या कुटुंब, आप्तेष्टांशी संवाद साधणे, बोलणे, मोकळ होणे हा उत्तम पर्याय आहे. त्यातून नैराश्य दूर होण्यास मदत होईल. अशा काळात वैद्यकीय सल्लाही अत्यंत महत्त्वाचा असतो.
- डॉ. शालिनी बिर्जे, मानसोपचारतज्ज्ञ
...........................