कोहिनूर रुग्णालयात ७५ हून अधिक गरजूंवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:10 AM2021-08-24T04:10:13+5:302021-08-24T04:10:13+5:30
मुंबई : ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोहिनूर रुग्णालयात १५ दिवसात ७५ रुग्णांवर विभिन्न प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार ...
मुंबई : ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोहिनूर रुग्णालयात १५ दिवसात ७५ रुग्णांवर विभिन्न प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या सर्व शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च एचसीपी या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कानाचा पडदा फाटणे, कानाचे हाड खराब होणे, थाईरॉईड यांच्यासारख्या शस्त्रक्रिया रुग्णांवर करण्यात येणार आहेत.
कानाचे उद्भवणारे आजार सहसा घशामुळे होतात. या आजारांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. कान फुटणे, कानातून पाणी गळणे, ऐकायला कमी येणे, चक्कर येणे ही लक्षणे रुग्णांमध्ये दिसतात. अनेक नागरिक डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. वेळीच उपचार व निदान न झाल्यास कानाचे दुखणे वाढू शकते. यावेळी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण शस्त्रक्रियेचा खर्च सर्वसामान्य गरजू रुग्णांना परवडण्याजोगा नसतो, अशा स्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रुग्णालयाद्वारे विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाद्वारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ७५ गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील.
कोहिनूर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. संजय हेलाले म्हणाले की, बऱ्याचदा अनेक रुग्ण उपचारासाठी पैसे नसल्याने रुग्णालयात येणे टाळतात. वेळीच उपचार न मिळाल्याने आजार वाढू शकतो. म्हणूनच कानावरील शस्त्रक्रिया गरजू रुग्णांना कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाने काही वर्षांपूर्वी खास उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारा चॅरिटेबल ट्रस्टची मदतीने रुग्णांवर परवडणाऱ्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १० ते १५ वर्षांत साधारणतः दहा हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दर रविवारी सायंकाळी ४ ते ७ वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. त्यात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांवर कमी दरात शस्त्रक्रिया केली जात आहे.