Join us

मेट्रो-३च्या मार्गातील आणखी ७६ झाडे तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:29 AM

मेट्रो-३ प्रकल्पाआड येणाऱ्या वृक्षांच्या छाटणीला शिवसेनेने कायम विरोध दर्शविला.

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाआड येणाऱ्या वृक्षांच्या छाटणीला शिवसेनेने कायम विरोध दर्शविला. मात्र मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकाच्या बांधकामाआड येणारी ७६ झाडे कापण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. या वेळी शिवसेनेच्या सदस्यांनी मौन बाळगल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यापैकी २६ झाडे कापण्यात येणार असल्याचे तसेच ५० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पांमध्ये बाधित झाडांना तोडण्यास शिवसेनेकडून विरोध होत होता. ई विभागातील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकाच्या बांधकामाआड येत असलेली झाडे कापण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र सत्ताधारी पक्षाचे कोणीच काही बोलत नाही हे पाहून काँग्रेसच्या सदस्याने शिवसेनेला टोला लगावला. त्यानंतरही शिवसेनेचे सदस्य गप्पच राहिल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.या स्थानकाच्या जागेत एकूण ७६ झाडे बाधित होत असून त्यातील २६ झाडे कापण्यात येणार असून ५० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांच्या अनुपस्थितीत प्राधिकरणाचे अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी भूषविले. या वेळी अध्यक्षांनी मेट्रोच्या प्रकल्पासाठी कापण्यात येणाºया झाडांचा प्रस्ताव पुकारला होता.

टॅग्स :मेट्रो