Join us

कोरोना रूग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात आठ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 6:11 PM

गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे.

मुंबई : कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरोगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे. शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ही माहिती दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रूग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रूग्णालयातील सुमारे बारा हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे. यासह गोरेगाव येथे २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करम्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ मुलुंड येथे २००० खाटा, दहीसर येथे २००० आणि भायखळा येथेही २००० खाटांची उभारणी अंतीम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस