मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार, भाजपचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:21 AM2019-09-20T05:21:54+5:302019-09-20T05:22:13+5:30
मुंबईत तब्बल ८६ हजार बोगस आणि दोन वेळा नावे असलेले मतदार आहेत.
मुंबई : मुंबईत तब्बल ८६ हजार बोगस आणि दोन वेळा नावे असलेले मतदार असून त्यात बांगलादेशी नागरिकांचाही समावेश असल्याचा दावा मुंबई भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. या ८६ हजार कथित बोगस मतदारांची यादीच आयोगाकडे सादर करत ही नावे तत्काळ मतदार याद्यांमधून हटविण्याची मागणीही भाजपने आयोगाकडे केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या पथकाने बुधवारी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी निवेदन सादर करीत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईतील मतदार याद्यांमधून बोगस आणि दुबार नावे वगळण्याची मागणी केली. मुंबई महानगरातील विविध विधानसभा क्षेत्रांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांचीही नावे आहेत. आयोगाने बोगस मतदारांची नावे वगळावीत, अशी मागणी करण्यात आली.