मलेरियाच्या नियंत्रणासाठी तीन वॉडर््सवर अधिक लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 02:19 AM2018-06-01T02:19:41+5:302018-06-01T02:19:41+5:30
काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाच्या स्वागतासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे.
मुंबई : काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाच्या स्वागतासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे. साथीच्या आजारांचे वाढते प्रमाण पाहता मलेरियाच्या नियंत्रणासाठी आणि मलेरिया मुक्तीसाठी यंदा अधिक सजगतेने पालिकेचा आरोग्य विभाग काम करीत आहेत. त्या दृष्टिकोनातून एफ/दक्षिण, जी/दक्षिण आणि ई विभागांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
यंदा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून या तीनही विभागांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गेल्या वर्षी मलेरियाच्या तब्बल सहा हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक संख्या या तीन विभागांत दिसून आली होती. त्यामुळे या विभागांतर्गत येणाºया एफ/दक्षिण- परळ, वडाळा, नायगाव, दादर पूर्व, जी/दक्षिण - एल्फिन्स्टन, लोअर परळ, वरळी आणि ई विभाग- भायखळा, माझगाव, मुंबई सेंट्रल आदी परिसरांत विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी सांगितले की, २४ विभागांपैकी तीन विभागांत अधिक लक्ष देण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे या विभागांत लोकसंख्या अधिक आहे. शिवाय, या विभागांत सुरू असणाºया अधिकाधिक बांधकामांच्या कामांमुळे डासांची अधिक पैदास होते. त्यामुळे या विभागांत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. २०३० पर्यंत मुंबई मलेरियाच्या मुक्तीसाठी काम करण्याचे ध्येय आहे, त्याप्रमाणे कृतिशील आराखड्यावर काम सुरू आहे.