छोट्या कंपन्यांनी गुंतवणुकीवर दिला अधिक लाभ
By admin | Published: April 15, 2015 01:49 AM2015-04-15T01:49:36+5:302015-04-15T01:49:36+5:30
मुंबई शेअर बाजारात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागांनी मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत अधिक लाभ गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.
शेअर बाजाराचा कल बदलतोय : मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील कल बदलत आहे. देशातील प्रमुख शेअर बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजारात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागांनी मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत अधिक लाभ गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.
ब्ल्यूचिप कंपन्यांतील गुंतवणूक अधिक लाभ देणारी असल्याचा आजपर्यंतचा समज होता. तो खोटा ठरवीत छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांनी बाजारात अधिक चांगली कामगिरी केली होती. २0१५ मध्येही हाच कल सुरू आहे. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक यंदा ७.७१ टक्क्यांनी वाढून ११,९४२.0३ अंकांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे मिडकॅप निर्देशांक ७.२७ टक्क्यांनी वाढून ११,१२७.४२ अंकांवर पोहोचला आहे. ३0 ब्ल्यूचिप कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मात्र ५.६१ टक्क्यांचीच वाढ मिळवू शकला आहे. सेन्सेक्स सध्या २९,0४४.४४ अंकांवर आहे. ४ मार्च रोजी सेन्सेक्सने आपला सार्वकालिक उच्चस्तर ३0,0२४.७४ अंकांवर नेला होता.
नियोजित बीएनपीचे शोधप्रमुख अॅलेक्स मॅथ्यूज यांनी सांगितले की, काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांचे मूल्यांकन अत्यंत आकर्षक आहे. त्यामुळे गुंतवणूकदार त्यात रुची दाखवीत आहेत. गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे छोटे समभाग अधिक चांगली कामगिरी करीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्स्मॉलकॅपने ५२ आठवड्यांचा उच्चांक करताना १२,00२.१८ अंकांची पातळी गाठली आहे. मिडकॅपने ४ मार्च रोजी सार्वकालिक उच्चांक गाठताना ११,१८0.७0 अंकांचा पल्ला गाठला होता.