महाशिवरात्रीनिमित्त रेल्वेसह जादा बेस्ट बस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:09 AM2019-03-03T02:09:50+5:302019-03-03T02:09:56+5:30
महाशिवरात्रीनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड या दरम्यान विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येईल.
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड या दरम्यान विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येईल. तसेच बेस्टकडूनही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस अशा दोन गाड्या ४ मार्च रोजी चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०१११३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनसहून ४ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी याच दिवशी दुपारी १२ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१११४ विशेष गाडी ४ मार्च रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सावंतवाडी रोडहून सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. ती ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना एसी २ टायरचा एक डब्बा, एसी ३ टायरचे २ डब्बे, ८ स्लीपर क्लास आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अशी आहे. तर महाशिवरात्रीनिमित्त कान्हेरी गुंफा आणि बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमातर्फे ४ मार्च रोजी विशेष जादा बसगाड्या चालविण्यात येतील. बसमार्ग क्रमांक १८८ वर बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा या दरम्यान सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ५ जादा बसगाड्या सोडण्यात येतील. भाविकांना मार्गदर्शन करण्यास गर्दीच्या ठिकाणी प्रामुख्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार, एलोरा चौकी आणि कान्हेरी गुंफा येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाºया भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसमार्ग ५७, ६७ आणि १०३ या बसमार्गांवर एकूण ६ जादा बस सोडण्यात येतील.
>होळीसाठी ठाण्यातून जादा ४५ एसटी बस
ठाणे : गणेशोत्सवाप्रमाणे होळीच्या सणालाही ठाणे-मुंबईतून कोकणात जाणाºया चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन ठाणे विभागातून जादा ४५ बस सोडणार आहे. त्या १६ ते २४ मार्चदरम्यान धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया ठाणे, बोरिवली, कल्याण, विठ्ठलवाडी या डेपोंतून या बस सोडण्यात येणार आहेत.