Join us

मुंबईत तरुण पिढीकडून कोरोनाचा अधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण पिढीकडून कोरोनाचा अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण पिढीकडून कोरोनाचा अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरात कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र दुसरीकडे लाॅकडाऊन शिथिल झाल्याने तरुण पिढीचा वावर खूप वाढला आहे. त्याचप्रमाणे तरुण पिढीत सर्वाधिक संसर्ग दिसून आल्याने या पिढीत सौम्य व मध्यम लक्षणे असलेली दिसून येत आहेत. त्यामुळे या पिढीकडून संसर्गाचा धोका अधिक असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ३० ते ४९ वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत या वयोगटातील दीड लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे ५० ते ६९ वयोगटाला कोरोनापासून सर्वाधिक धोका आहे. या वयोगटातील नागरिक सहव्याधींनी ग्रस्त असतात. ५० ते ६९ वयोगटात १ लाख २८ हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तरुणांपेक्षा वुद्धांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. पण मृत्युदर जास्त आहे. आतापर्यंत ५० ते ६९ वयोगटातील ५,८५० नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तेच ३० ते ४९ वयोगटातील १,४२८ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

याविषयी, संसर्गतज्ज्ञ डॉ. संतोष माणिक यांनी सांगितले, सहव्याधी असल्याने ज्येष्ठ नागरिकांना कोणताही संसर्ग अधिक होतो, त्यामुळे याविषयी खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याने ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडत नाहीत किंवा घरातील माणसेही ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा देत नाहीत. त्यामुळे जास्त प्रमाणात घराबाहेर असणारे वा सार्वजनिक जागांमध्ये वावर तरुण पिढीचा असतो. अशा स्थितीत या पिढीकडून कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे या पिढीतील सर्वांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे नियम पाळले पाहिजेत. त्यात मास्कचा वापर गरज असल्यास डबल मास्किंग करणे, स्वच्छता ठेवणे आणि शारीरिक अंतर राखणे यावर भर दिला पाहिजे.

राज्यातही या वयोगटातील रुग्ण अधिक

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यातही एकूण रुग्णसंख्येत ३० ते ४९ वयोगटातील ५ लाख ९३ हजार ४१३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत हे प्रमाण २१.२९ टक्के इतके आहे. याखालोखाल, ४१ ते ५० वयोगटातील ५ लाख ३ हजार ६५ रुग्ण आहेत. तर २१ ते ३० वयोगटातील ४ लाख ६३ हजार ८४० रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये पुरुष रुग्णांचे प्रमाण ६१ तर महिला रुग्णांचे प्रमाण ३९ टक्के आहे.