मुंबई : सुमारे ९७ हजार कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळामध्ये ९०२१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ८६५९ कर्मचारी कोरोनामुक्त होऊन, पुनश्च: कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर ५७ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत असून ३०५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार अशा हजारो अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर होती. सुमारे १५००-२००० कर्मचारी दररोज ६००-८०० फेऱ्यांंद्वारे १५ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करत होते. त्यावेळी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत होते.
प्रत्येक बस प्रवासाला निघण्यापूर्वी योग्य रितीने निर्जंतूक करण्यात येत होती. यादरम्यान, एसटीच्या मुंबई व ठाणे विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. तसेच दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. राज्यातील ९७००० कर्मचाऱ्यांपैकी ६६१४८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.