Join us

सव्वातीनशेहून अधिक वाहनांना दिला बनावट टी.सी. क्रमांक, अर्चना मोटर्सचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 2:49 AM

एमएच ०३ टी.सी. ३३७ या बनावट टी.सी. क्रमांकाच्या आधारे मे. अर्चना मोटर्सने अडीच वर्षांत ३३० वाहनांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती वाहतूक शाखेच्या चौकशीत उघड झाली. तसेच त्यांच्याकडे परवानादेखील नसल्याचे उघड झाले.

मुंबई : एमएच ०३ टी.सी. ३३७ या बनावट टी.सी. क्रमांकाच्या आधारे मे. अर्चना मोटर्सने अडीच वर्षांत ३३० वाहनांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती वाहतूक शाखेच्या चौकशीत उघड झाली. तसेच त्यांच्याकडे परवानादेखील नसल्याचे उघड झाले.घाटकोपर पूर्व परिसरात विक्रोळी वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियोजन सुरू असताना, १६ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने येत असताना एका दुचाकीस्वार महिलेला अडविले. तिच्या दुचाकीवर तब्बल १ लाख २४ हजार रुपये एवढा दंड असल्याचे समजताच तरुणीलाही धक्का बसला. चौकशीत तिने आठ दिवसांपूर्वी मे. अर्चना मोटर्सचे मालक महादेव काणेकर यांच्याकडून ६८ हजार रुपयांत ती खरेदी केल्याचे सांगितले.पोलिसांनी चौकशीसाठी दुचाकी ताब्यात घेतली. चौकशीत, एमएच ०३ टी.सी. ३३७ हा बनावट टी.सी. क्रमांक वापरून २०१६ पासून ३३० वाहने विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीओकडून हा टी.सी. क्रमांक हिंदुस्थान को-आॅप. बँक या वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीला दिलेला आहे. याचा वापर अनेक दुचाकी डिलर्सने स्वत:च्या फायद्यासाठी करीत गाड्यांची विक्री केली असल्याचे उघड झाले. त्यानुसार अर्चना मोटर्ससह अन्य वितरकांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त विनय वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष साबळे आणि अंमलदारांनी ही कारवाई केली.

टॅग्स :बाईकमुंबई