राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:29+5:302021-01-21T04:07:29+5:30

राज्यातील आकडेवारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील वर्षी लाॅकडाऊन असल्यामुळे अवयवदानाची प्रक्रियाही खंडित झाली होती. परिणामी, गेल्या ...

More than five thousand patients awaiting kidney transplant in the state | राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत

राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत

Next

राज्यातील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील वर्षी लाॅकडाऊन असल्यामुळे अवयवदानाची प्रक्रियाही खंडित झाली होती. परिणामी, गेल्या वर्षी अवयवदानाचे प्रमाण कमी झाले. ही प्रक्रिया आता सुरळीत होत असली तरी राज्यात सध्या पाच हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई जिल्हे अवयवदान प्रत्यारोपण समितीच्या माहितीनुसार, राज्यात मूत्रपिंडासाठी ५ हजार ४८७, यकृतासाठी १ हजार ९५, हृदयाकरिता ८९, फुप्फुस १९ , स्वादुपिंड ४८ आणि छोट्या आतड्यांसाठी ५ रुग्ण प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीत आहेत. अवयवदानाबाबत सरकार तसेच व्यक्ती- विविध संस्थांकडून अवयवदानाबाबत जनजागृजी होत असली, तरी देशात नेत्रदान व देहदान या पलीकडे त्याविषयी जागरूकता झालेली नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, हृदय, किडनी, यकृत यांसह सर्व प्रकारची हाडे दान करता येतात. त्याचा वापर असे अवयव निकामी झालेल्या रुग्णांना होतो, याबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीचे डॉ. सतीश माथुर यांनी सांगितले.

देशभरात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत व २००० हून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयवदात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात रोज वाढ होत आहे.

* अवयवदान करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे

संबंधित दात्याने जिवंतपणी किंवा त्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसदाराने लेखी स्वरूपात तसे नमूद केलेले असावे, असा भारतीय कायद्याचा दंडक आहे.

दात्याला विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. ताे काेणत्याही सरकारी किंवा मोठ्या खासगी रुग्णालयात उपलब्ध असतो.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या www.notto.nic.in या संकेतस्थळावरूनही हा अर्ज डाऊनलोड करून घेता येऊ शकतो.

दात्याच्या संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाइकांना सही गरजेची असते. अर्ज भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते.

दात्याची डोनर कार्डवर सही असली तरी मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या नातेवाइकांच्या संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून दात्याच्या इच्छेविषयी नातेवाइकांना माहिती असणे गरजेचे असते.

मृत्यूपश्‍चात अवयव प्रत्यारोपण किती तासांत शक्‍य?

नेत्रदान - चार ते सहा तासांच्या आत

त्वचादान - चार ते सहा तासांच्या आत

हाडे - सहा तासांच्या आत

फुप्फुस : सहा तासांच्या आत

मूत्रपिंड - ४८ तासांच्या आत

Web Title: More than five thousand patients awaiting kidney transplant in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.