मुंबई : मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून विनापरवाना साठा केलेली वैद्यकीय सामुग्री जप्त केली. कारवाईदरम्यान रुग्णालयाच्या रूम नं. ३०६ हायराईज बिल्डिंगमध्ये विनीत तुकारात पिंपळे हे मेडिकल सर्जिकल अँड हॉस्पिटल इक्विपमेंट या नावाने आॅर्थोपेडिक इंप्लान्टसची विना परवाना खरेदी व विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून इंट्रामेड्युलरी नेल्स अँड इंटरलॉकिंग बोल्ट्स अशा स्वरूपाचे तब्बल ४ लाख किमतीचे आॅर्थोपेडिक इम्प्लान्टस् जप्त करण्यात आले.या आॅर्थोपेडिक इम्प्लान्टस्ची खरेदी मे.अॅसलेपायस एन्टरप्रायजेस नांदेड यांच्याकडून केल्याची माहिती एफडीएला मिळाली आहे. या माहितीसह नांदेड येथे धाड टाकून १ कोटी ७ लाख इतक्या किमतीचे आॅर्थोपेडिक इप्लांट्स या प्रवर्गातील वैद्यकीय सामुग्रीचा साठा जप्त केला आहे. नांदेड येथील या संस्थेकडेदेखील वैद्यकीय सामुग्रीचा साठा व विक्री करण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले आहे. या संस्थेकडे परवाना नसतानादेखील उत्पादक मे. शर्मा सर्जिकल अँड इंजिनिअरिंग प्रा.लि.(वडोदरा, गुजरात) व आॅर्थोटेक इंप्लान्ट्स विथ काँफिडन्स, (वलसाड, गुजरात) यांनी या संस्थेस अधिकृत डीलर म्हणून नेमले होते. पुढील तपासाकरिता पथक गुजरात येथेदेखील जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिली. तपासाअंती राज्यभरात विविध ठिकाणी २२ संस्थांना वैद्यकीय सामुग्रीची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)
एक कोटीपेक्षा अधिक वैद्यकीय सामुग्री जप्त
By admin | Published: February 09, 2017 2:49 AM