प्रभागात जागा उपलब्ध झाल्यास एकाहून अधिक लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:00+5:302021-05-06T04:07:00+5:30
पालिका प्रशासनाची माहिती; स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईकरांना लसीकरण करण्यासाठी २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक ...
पालिका प्रशासनाची माहिती; स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांना लसीकरण करण्यासाठी २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असे मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, गरज आणि मागणी झाल्यास काही प्रभागांमध्ये एकाहून अधिक लसीकरण केंद्र उघडण्याचा पालिकेचा मानस असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मागील आठवड्यात पालिकेकडून २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र उघडण्याचे प्रयोजन करण्यात आले. पालिकेने तसे आवाहनही केले. त्याला प्रतिसाद देताना प्रभागातील आजी, माजी नगरसेवकांनी पालिकेकडे लसीकरण केंद्र उघडण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. १२२ प्रभागातील माजी नगरसेवक चंदन शर्मा यांनी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी एस. वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलाश कुशेर यांनी दिली. तर आपल्या प्रभागातच लसीकरण केंद्र व्हावे, यासाठी नगरसेविका वैशाली पाटील याही प्रयत्न करत असून, पालिका अधिकारी नुकतेच जागा पाहून गेल्याचे पाटील यांनी सांगितले. नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनीही लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले.
नियमाप्रमाणे महापालिकेच्या शाळेत लसीकरण केंद्र असू शकत नसल्याने जैन मंदिर परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबतचे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिल्याचे भाजपचे १२२ प्रभागातील अध्यक्ष विलास सोहनी यांनी सांगितले. दरम्यान, एखाद्या प्रभागात एकाहून अधिक लसीकरण केंद्र गरजेनुसार उभारू शकतो. यासाठी जागा उपलब्ध असल्यास प्रभागात अधिक लसीकरण केंद्र उभारण्याचा पालिकेचा मानस असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
.................................