Join us

कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 4:04 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. ...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३ हजार ९०८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यात मुंबई महानगरपालिका प्रशासन काही अंशी यशस्वी ठरताना दिसत आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत एकूण ३,९०८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर एकूण ५,९०० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना साखळी तुटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बाधितांची संख्या ही कोरोनामुक्त रुग्णांच्या दुप्पट असायची, परंतु निर्बंधांमुळे आता ही संख्या आटोक्यात आणण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. बाधितांची संख्या आटोक्यात आली असली, तरी मात्र कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र १००च्या घरात पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाची साखळी तोडण्यात यश येताना दिसत आहे. मागील २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५७ रुग्ण पुरुष व ३३ रुग्ण महिला होते. ९ रुग्णांचे वय ४० वर्षांखाली होते. ५० रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित ३१ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटांतील होते.

मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ५२ हजार ५३२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ५ लाख ७८ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तसेच आता ५९ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे १३ हजार २५१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण ५४ लाख ६१ हजार ६०५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या २४ तासांत ३७,६०७ चाचण्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबई जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा ८९ दिवसांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९६ दिवसांवर आला आहे. २४ ते ३० एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.७० टक्के असल्याची नोंद आहे.