Join us

दुहेरी मास्कमुळे अधिक संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:06 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. हा विषाणू आता ...

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. हा विषाणू आता अधिक संक्रमित व संसर्गित आहे. अलीकडील वाढत्‍या प्रादुर्भावामुळे आपल्‍या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करायला हवे, ज्‍यामध्‍ये मास्‍क घालणे, सोशल डिस्टिन्सिंग राखणे, हात स्‍वच्‍छ धुणे व सॅनिटाइज करणे यांचा समावेश आहे. मास्कचा वापर करताना ताे जर दुहेरी असेल तर अधिक संरक्षण हाेते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

अवघड काळात दुहेरी मास्‍क घातल्‍यामुळे विषाणूपासूनच्‍या संरक्षणामध्‍ये वाढ होते आणि विषाणूचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता कमी हेाते. सेंटर्स फॉर डीसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्‍हेंशन (सीडीसी) येथे नुकतेच करण्‍यात आलेल्‍या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीने दुहेरी मास्‍क घातला तर कोविडचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता ९६.४ टक्‍क्‍यांनी कमी हेाऊ शकते, त्यामुळे दुहेरी मास्क उपयुक्त असल्याचे इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. कीर्ती सबनीस यांनी सांगितले.

जेव्‍हा एखादी व्‍यक्‍ती एका मास्‍कवर दुसरा मास्‍क घालते तेव्‍हा त्‍याला दुहेरी मास्‍क घालणे असे म्‍हणतात. बाहेरील मास्‍क आतील मास्‍कच्‍या कोपऱ्यांवर सौम्‍य दबाव निर्माण करून उत्तम सीलबंद करू शकतो. विषाणू श्‍वसनमार्गावाटे बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्सच्‍या माध्‍यमातून पसरत असल्‍यामुळे मास्‍कचा हा दुहेरी स्‍तर फिल्‍ट्रेशन वाढवण्‍यामध्‍ये मदत करू शकतो आणि आजूबाजूला असलेली व्‍यक्‍ती शिंकल्‍यास किंवा खोकल्‍यास त्‍यापासून संरक्षण करू शकतो.

* दुहेरी मास्‍क कसा व कधी घालावा

विमानतळ, बस स्‍टॅण्‍ड अशा गर्दीच्‍या ठिकाणी जाताना, तसेच कामानिमित्त प्रवास करण्‍यासाठी सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर करताना दुहेरी मास्‍क घालावा.

एका सर्जिकल मास्‍कवर कापडी मास्‍क किंवा दोन कापडी मास्‍क किंवा ३ - प्‍लाय मास्‍कवर एक कापडी मास्‍क हे संयोजन उपयुक्‍त आहे.

अत्‍यंत गर्दीच्‍या ठिकाणी मास्‍कसोबत फेस शील्‍ड वापरता येऊ शकते.

एन-९५ मास्‍क वापरत असाल तर दुहेरी मास्‍क घालणे टाळावे.

मुलांनी दुहेरी मास्‍क घालणे टाळावे.

* मास्‍क घालताना हे करा

- दररोज गरम पाण्‍याने कापडी मास्‍क स्‍वच्‍छ धुवा.

- नाक, तोंड व हनवुटीला व्‍यापून घेत मास्‍क योग्‍यरीत्‍या घाला.

- कुटुंबामधील सदस्‍यांसोबत मास्‍क शेअर करणे टाळा.

- कोणताही मास्‍क काढल्‍यानंतर हात सॅनिटाइज करा.

- ठरावीक अंतराने मास्‍क बदलून नवीन मास्‍क घाला.

- बंदिस्‍त कचऱ्याच्या डब्‍यामध्‍येच खराब झालेला मास्‍क टाका.

........................................