मुंबई - कोविडचा प्रसार मुंबईत पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कुलाबा, ग्रँट रोड, अंधेरी आणि वांद्रे पश्चिम या विभागांमध्ये बाधित रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाई पालिकेने तीव्र केली आहे. या कारवाई अंतर्गत कोरोना रुग्ण संख्येत वाढ असलेल्या कुलाबा, फोर्ट भागात गेल्या २४ तासांत विनामास्क फिरणाऱ्या सर्वाधिक ७३१ नागरिकांना दंड ठोठावला आहे. तर संपूर्ण मुंबईत ७४४९ लोकांवर कारवाई करीत १४ लाख ८९ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविड निर्बंध शिथिल केल्यानंतरही मुंबईत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात होता. मात्र परदेशातील ओमायक्रॉनचा शिरकाव मुंबईत झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या संख्येत देखील वाढ दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावून फिरणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाचे उल्लंघन मुंबईत सर्रास होताना दिसत आहे. विना मास्क फिरणाऱ्या आठ ते दहा हजार नागरिकांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र रेल्वे परिसरातील ही कारवाई मागील काही महिन्यांमध्ये पूर्णपणे थंडावली आहे.
एप्रिल २०२० ते २५ डिसेंबर २०२१
नागरिक....आतापर्यंत दंड
३३ लाख ६३ हजार १३६...... ६६ कोटी ७५ लाख ५७ हजार ७७१ (महापालिकेमार्फत कारवाई)
सात लाख ६१ हजार ८२०....१५ कोटी २३ लाख ६४ हजार (मुंबई पोलिसांमार्फत कारवाई)
एप्रिल २०२० ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत पालिका आणि पोलिसांच्या एकत्रित कारवाईत ४१ लाख ५६ हजार २९६ नागरिकांकडून ८२ लाख ६४ लाख ५० हजार ७७१ रुपये दंड वसूल केला आहे.
विभाग... नागरिक.... दंड
कुलाबा ते सायन.. ५७०७०५... ११४७२६९००
परळ ते धारावी.... ५५२०२१... ११०७१२१००
सांताक्रूझ ते अंधेरी पूर्व... ४४०२५८... ८०५७७४००
अंधेरी प. ते मालाड... ६१६४५०... १२३९३५४००
कांदिवली ते दहिसर... ४५२५७५... ९११६९५००
कुर्ला ते चेंबूर... ३७८३५२... ७५८३६८७१
घाटकोपर ते मुलुंड... ३५८१४८... ७१६७४२००