कमी वेळेत जास्त पाऊस पडणार; मुंबईकरांनो काळजी घ्या!
By सचिन लुंगसे | Published: June 11, 2024 07:54 PM2024-06-11T19:54:56+5:302024-06-11T19:55:13+5:30
जुलै महिना मोठ्या पावसाचा.
मुंबई: जागतिक तापमान वाढीचा फटका मुंबईलाही बसत असून, याचा परिणाम म्हणून मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कमी दिवसांत किंवा कमी वेळेत अधिक पाऊस पडून मुंबई तुंबण्याच्या घटनांत वाढ होत आहे. यंदाच्या मान्सूनमध्येही मुंबईकरांना कमी वेळेत जास्त किंवा कमी दिवसांत जास्त पावसाला सामोरे जावे लागेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी वर्तविला.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायर्जसच्या वतीने चर्चगेट येथील आयएमसीमध्ये मुंबई महानगरातला बदलता मान्सून या विषयावर आयोजित वार्तालापात सुनील कांबळे बोलत होते.
पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी जुलै महिन्यात मुंबईकरांना अधिकच्या पावसाळ्याला सामोरे जावे लागेल. जुलै महिन्यात सरासरी ९०० मिलीमीटर पाऊस होतो. यावर्षी कदाचित या पेक्षा जास्त पाऊस होईल. तर पूर्वी मुंबईमध्ये एकदा मान्सून दाखल झाला की काही दिवस पाऊस सलग लागून राहत होता. मात्र आता यात पावसाच्या दिवसांत बदल झाले आहेत. आता पाऊस सलग लागून राहत नाही. तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचे प्रमाण अधिक असते. तर कधी आठवडाभर पाऊस पडत नाही. तर कधी तीन तीन तास सलग पाऊस लागून राहतो. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाला अशा पावसाची माहिती देण्यासाठी हवामान खात्याने सर्व यंत्रणांशी समन्वय साधला असून, हे काम नियंत्रण कक्षाद्वारे केले जात आहे, असे सुनील कांबळे यांनी सांगितले.
मुंबईत २ डॉप्लर रडार असून, त्याद्वारे १० मिनिटांनी हवामानाची माहिती मिळवली जात आहे. दिशा समजण्यासाठी कोणते ढग, किती पाऊस देणार आहेत. ३ तासांत कुठे आणि किती पावसाची शक्यता आहे ? याची माहिती मिळण्यास याची मदत होत आहे.
मुंबईत आणखी ४ ठिकाणी रडार लागणार असून, आयआयटीएमद्वारे याचे काम केले जात आहे. यामुळे अंदाज वर्तविण्यासाठी आणखी मदत होईल.
हवामानाची माहिती मिळण्यासाठी वेदर बलूनचा उपयोग केला जात असून, ३५ किमीवर जाणारे हे वेदर बलून हवामानाच्या माहितीमध्ये भर घालत आहेत.
रेड अलर्ट देताना हवामान विभागाचे अधिकारी एकत्र चर्चा करतात. मनात आले आणि रेड अलर्ट दिला, असे होत नाही. त्यासाठी हवामानाचा नीट अंदाज घेतला जातो.
सोशल मीडियावर हवामानसंबधी भरपूर अफवा पसरविल्या जातात. मात्र त्यावर विश्वास ठेवू नका. हवामानाशी संबंधित माहिती हवामान विभागाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर दिली जाते.
मुंबईकरांना आता ३ तासांच्या हवामानाचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे पुढील नियोजन करणे मुंबईकरांना आणखी सोपे होत आहे.
मुंबई महापालिका, विमानतळ प्राधिकरणासह उर्वरित यंत्रणांशी हवामान विभागाचा समन्वय साधला जातो. जेणेकरून मोठा पाऊस येणार असेल तर सर्व यंत्रणा मदतीसाठी तत्पर ठेवल्या जातात.
अलर्ट म्हणजे काय
- ग्रीन अलर्ट - संबंधित ठिकाणी कोणताही धोका नाही. सर्व काही ठिक आहे.
- यलो अलर्ट - पुढील काही दिवसांत हवामानाच्या बदलामुळे संकट ओढावू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो.
- ऑरेंज अलर्ट - नैसर्गिक आपत्तीमुळे येणा-या संकटासाठी नागरिकांनी तयार राहावे म्हणून हा अलर्ट जारी केला जातो.
- रेड अलर्ट - नैसर्गिक आपत्ती ओढविल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट जारी केला जातो. यामध्ये लोकांनी स्वत:ला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे.