केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचे ५० कोटींहून अधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:18+5:302021-05-19T04:06:18+5:30

चक्रीवादळाचा फटका : पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील ...

More than Rs 50 crore loss to cable and internet providers | केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचे ५० कोटींहून अधिक नुकसान

केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचे ५० कोटींहून अधिक नुकसान

Next

चक्रीवादळाचा फटका : पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील केबल आणि इंटरनेट पुरवठादारांचे ५० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी केबलचालक आणि मालकांनी केली आहे.

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी रौद्ररूप धारण केल्यामुळे केबल आणि इंटरनेट सेवेला फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक विभागांत केबलसेवा ‘नॉट रिचेबल’ होती. टप्प्याटप्प्याने दुरुस्तीकामे हाती घेत पुरवठा सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे केबल व्यावसायिक रजनीश हिरवे यांनी सांगितले.

शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिकमधील केबल व इंटरनेट यंत्रणा बाधित झाली आहे. झाडे उन्मळून पडल्याने फायबर वायरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शहरी भागात केबल व इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास २४ तास, तर निमशहरी व ग्रामीण भागात एक आठवड्याहून जास्त काळ लागण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या केबलचालकांना भरपाई देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे आम्हाला सरकारी मदतीपासून वंचित राहावे लागले. आता या तौक्ते चक्रीवादळामुळे पुन्हा ५० कोटींहून अधिक फटका बसला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आधार देण्यासाठी पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी पाटील यांनी केली. केबलचालकांच्या जिवावर हजारो कोटींचा महसूल कमाविणाऱ्या उपग्रह वाहिन्या व अन्य यंत्रणांनी या नुकसानीची कोणतीही दखल घेतली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

...........................

Web Title: More than Rs 50 crore loss to cable and internet providers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.