पाणी प्या, सोबत कांदा ठेवा; टोपी किंवा छत्रीचा वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 01:20 PM2023-06-08T13:20:47+5:302023-06-08T13:22:10+5:30

मुंबईत १५० पेक्षा अधिक आढळले उष्माघाताचे संशयित रुग्ण

more than 150 suspected heat stroke patients found in mumbai | पाणी प्या, सोबत कांदा ठेवा; टोपी किंवा छत्रीचा वापर करा!

पाणी प्या, सोबत कांदा ठेवा; टोपी किंवा छत्रीचा वापर करा!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही वर्षांपेक्षा मुंबईत यंदा तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. मुंबईकरांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील  डॉक्टर आणि नागरिकांमध्ये उष्माघात (हीट स्ट्रोक) या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागानेही नागरिकांना उष्मघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड जागी, सावलीखाली ठेवा, त्या व्यक्तीला ओल्या कपड्याने पुसून काढा तसेच वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी करा. या गोष्टी तातडीने कराव्यात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचविले आहे.  

राज्यात मुंबईसह कडाक्याचे ऊन आहे. या अशा तापमानात शरीरात प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे प्रचंड त्रास होतो. शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. शरीर निर्जलीकरण होते. त्यामुळे उष्माघात होऊ शकतो आणि तो काही वेळा जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे दुपारच्या कडाक्याच्या उन्हात गरज नसताना बाहेर पडू नये. तसेच त्या काळात सतत पाणी पित राहाणे गरजेचे आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५० पेक्षा अधिक उष्माघाताचे संशयित रुग्ण मुंबईच्या उपनगरात आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  मुंबईत कोणत्याही रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू झालेला नाही.

काय काळजी घ्याल ?

-  तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
-  हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
-  प्रवासात पाणी व कांदा सोबत ठेवा.
-  मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.
-  उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
-  तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
-  तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
-  पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
-  तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
-  ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते.

काय उपचार कराल ?

व्यक्तीला ‘ओआरएस’ प्यायला द्या किंवा लिंबू सरबत/तोराणी किंवा जे काही शरीराला ‘रिहायड्रेट’ करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या. व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा.

काही वर्षाच्या तुलनेने या वर्षी उन्हाळा अधिक आहे. नागरिकांना उष्णतेचा त्रास होतो. या परिस्थितीत कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत राज्याच्या आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत. तरीही कुणाला उष्माघाताचा अधिक त्रास झाल्यास ते रुग्णालयात आणून उपचार घेऊ शकतात. सुदैवाने आपल्याकडे कुठलाही उष्माघाताचा गंभीर रुग्ण अद्याप आलेला नाही. - डॉ. अक्षय हिवाळे, सहायक प्राध्यापक, सर जे. जे. रुग्णालय.

 

Web Title: more than 150 suspected heat stroke patients found in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.