Join us

२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 4:48 AM

अनेक ‘एनआरआय’ना हवीय परदेशातून मतदानाची सुविधा.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त किंवा निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे राहणाऱ्यांनाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी आहे, मात्र त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे. मुंबई शहरातील अशा मतदारांची संख्या ४०७, तर उपनगरात १,८८१ एवढी आहे. 

लोकसभा निवडणुकीत अनेक अनिवासी भारतीय (एनआरआय) फक्त मतदानासाठी मुंबईत आले होते. मात्र, मतदारयादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने आधीपासून दक्षता घेतली आहे. परदेशात असलेल्या मतदारांनी यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी आणि मगच मतदानासाठी यावे, असे आवाहन निवडणूक आयोग प्रशासनाने यापूर्वीच केले आहे. 

पासपोर्ट आवश्यक मुंबईत दोन हजारांहून अधिक अनिवासी भारतीय मतदार आहेत. त्यांचे नाव मतदारयादीत असल्याने त्यांना पासपोर्टच्या पुराव्याआधारे मतदान करता येईल. अनिवासी भारतीयांना ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  

अनेक तरुण नोकरीनिमित्त परदेशात आहेत. काहीजण व्यवसाय- उद्योगानिमित्त परदेशात राहत आहेत. त्यांपैकी बहुतेकांची नावे येथील मतदार यादीत आहेत. मायदेशी येऊन मतदान करणे, हाच एक पर्याय त्यांच्याकडे आहे.  

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची माझी इच्छा आहे. मात्र, कामाच्या निमित्ताने आम्ही परदेशात आहोत. मतदानासाठी भारतात येऊ शकत नाही. या तंत्रज्ञान युगात परदेशस्थ भारतीयांना तेथून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. - गणपत गवस, परदेशात असलेले मतदार  

- कामानिमित्त परदेशात असलेल्या भारतीयांसाठी टपाली मतदानाची किंंवा अन्य पर्यायांद्वारे मतदानाची व्यवस्था करण्याचा विचार आयोगाने करावा, अशी विनंती अनेक मतदार करीत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४भारतीय निवडणूक आयोग