Join us

एका दिवसात कचऱ्याच्या २५० हून अधिक तक्रारी; १७९ सोडविल्याचा पालिकेचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 1:07 PM

तक्रारींवरून मुंबईतील कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे ते समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : स्वच्छ मुंबईसाठी सुरू करण्यात आलेल्या पालिकेच्या कचऱ्याच्या हेल्पलाइनवर २४ तासांच्या आतच जवळपास ३१९ तक्रारी मुंबईकरांकडून नोंदविण्यात आल्या. त्यातील कचरा आणि डेब्रिजशी संबंधित असलेल्या २५७ तक्रारी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून हाताळण्यात आल्या असून त्यातील १७९ तक्रारी तत्काळ सोडविल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच गुरुवारी दुपारनंतर आलेल्या ७८ तक्रारीही लवकरच सोडविण्यात येतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. दरम्यान, २४ तासांच्या आत मुंबईकरांकडून करण्यात आलेल्या २०० ते २५० तक्रारींवरून मुंबईतील कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे ते समोर येत आहे.

पालिका प्रशासनाकडून स्वच्छ मुंबईसाठी घनकचरा आणि मुंबईतील डेब्रिजच्या तक्रारी मुंबईकरांना थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी ही हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या हेल्पलाइनवर आलेल्या मुंबईकरांच्या तक्रारीनंतर तातडीने संबंधित परिसरातील कचरा आणि डेब्रिज उचलले जात असून त्यासाठी पालिकेची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, केवळ कचरा आणि डेब्रिजच्याच तक्रारींची नोंद घेतली जात असून त्याच तक्रारी सोडविण्यात येत आहेत. 

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर ७ ते ८ जून रात्री उशिरापर्यंत केवळ घनकचरा व डेब्रिजच्या एकूण ३१९ तक्रारी आल्या. परंतु त्यातील ५७ तक्रारी या कचरा आणि डेब्रिजशी संबंधित नसून या खासगी मालमत्तांच्या आवारातील कचऱ्याबाबतच्या असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित २५७ तक्रारींपैकी १७९ तक्रारी पालिकेकडून सोडविल्या असून इतर ७८ ठिकाणच्या तक्रारींवरही पालिकेचे पथक काम करीत आहे. ७८ ठिकाणी कचरा जास्त असल्याने त्या सोडविण्यात वेळ लागत असल्याचे उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.

तक्रार करताना मोबाइल लोकेशन सुरू ठेवा 

हेल्पलाइनवर तक्रार करण्याआधी मुंबईकरांनी काही बाबींकडे दुर्लक्ष केल्याने तक्रारींचा आकडा वाढला आहे. वास्तविक तक्रार करताना किंवा कचऱ्याचे वा डेब्रिजचे छायाचित्र काढताना मोबाइलचे लोकेशन सुरू असणे गरजेचे आहे. काही नागरिकांनी छायाचित्र काढताना लोकेशन बंद ठेवले होते. घरी अथवा अन्य ठिकाणी गेल्यावर लोकेशन ऑन करून कचऱ्याचा फोटो अपलोड केल्याने तक्रारींचा तपशील पालिका प्रशासनाला कळू शकत नाही.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका