Join us

स्वच्छता हीच सेवा; मुंबई विद्यापीठासह ३०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

By स्नेहा मोरे | Published: October 01, 2023 7:41 PM

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रव्यापी अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाने उत्स्फुर्त सहभाग घेत फोर्ट, कलिना, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उपपरिसरांसह ३०० हून अधिक महाविद्यालयांनी सकाळी १० ते ११ या एक तासात स्वच्छतेसाठी श्रमदान केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियाना अंतर्गत कलिना संकुलातील विविध परिसराची स्वच्छता करण्यासाठी सुमारे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांसह, विविध प्राधिकरणातील सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. गरवारे व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. केयुर कुमार नाईक यांनी दादर येथील समुद्र चौपाटी स्वच्छतेसाठी सहभाग घेतला. त्याचबरोबर जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, फोर्ट संकुल, विविध वसतिगृहे, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अंबाडवे आणि तळेरे येथील दोन्ही घटक महाविद्यालये आणि ३०० हून अधिक संलग्नित महाविद्यालयांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रव्यापी अभियानात उत्स्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान केले. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.

कचरामुक्त कॅम्पस !

स्वच्छतेची शपथ घेऊन उपक्रमात सहभागी झालेल्या ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. प्लास्टिक मुक्त कॅम्पसच्या दिशेने वाटचाल करीत कलिना संकुलात ‘गो-शून्य’ या विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अपच्या सहाय्याने विद्यापीठाने कचरामुक्त कॅम्पससाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ