राज्यातील ७५ पैकी ४० हून अधिक आठवडी बाजार बंद;'पणन'ने जबाबदारी झटकल्याने ओढवले संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:59 IST2025-03-09T06:59:16+5:302025-03-09T06:59:28+5:30
योगेश बिडवई मुंबई : शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ताजा शेतमाल शहरात विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या संत ...

राज्यातील ७५ पैकी ४० हून अधिक आठवडी बाजार बंद;'पणन'ने जबाबदारी झटकल्याने ओढवले संकट
योगेश बिडवई
मुंबई : शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा ताजा शेतमाल शहरात विक्री करण्यासाठी सुरू केलेल्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानाची जबाबदारी कृषी पणन मंडळाने झटकली आहे. त्यामुळे पणन मंडळामार्फत २०१६ मध्ये सुरू झालेल्या मंत्रालयाशेजारील आठवडे बाजारासह राज्यातील ७५ पैकी ४० हून अधिक आठवडी बाजार बंद झाले आहेत.
शेतकरी आठवडी बाजाराचे दैनंदिन नियोजन करणे शक्य नसल्याचे सांगत कृषी पणन मंडळाने १३ मार्च २०२० रोजी ठराव करीत जबाबदारी महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्याचा निर्णय घेतला.
पणन मंडळ काय म्हणते...
पणन मंडळाने परवानगी दिलेल्या ७५ आठवडे बाजार आयोजकाने विहीत नमुन्यात किंवा कोणतीही माहिती दिलेली नसल्याने अटी व शर्तीची पूर्तता होत नाही. त्यामुळे ७५ शेतकरी आठवडे बाजाराच्या परवानग्या व बाजार आयोजनाचे आयोजकत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच श्री स्वामी शेतकरी उत्पादक कंपनीस साधन संस्था म्हणून मान्यता दिली आहे. सध्या आठवडे बाजार परवानगीचा अर्ज प्रलंबित नाही.
'कृषी पणन'ने काय अडचणी सांगितल्या...
पणन मंडळाकडे शहरात प्रभाग स्तरावर अधिकारी नाहीत
जागा महापालिकेच्या असतात, त्यामुळे आठवडी बाजाराशी संबंधित कामे करणे महापालिकेस शक्य
अनधिकृत बाजारांमुळे आठवडी बाजार अभियानाची प्रतिमा मलिन होते
मंत्रालयाशेजारील आठवडी बाजारात विविध जिल्ह्यांतील २० ते २५ शेतकरी गट दर रविवारी भाजीपाला व फळे विक्रीसाठी आणायचे. चांगला भावही मिळत होता. पणन मंडळाची जबाबदारी नंतर कृषी विभागाकडे गेली. नंतर काय झाले माहिती नाही. अमोल गोरे, ग्रीनफिल्ड अॅग्रो सर्व्हिसेस, चांदवड (नाशिक) 6
शेतकऱ्यांना विक्रीसाठी मदत करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. आठवडी बाजार सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. अनेक बाजार बंद झालेत -सदाभाऊ खोत, माजी कृषी व पणन राज्यमंत्री