फटाके फोडताना मुंबईत ५०हून अधिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 09:09 AM2024-11-04T09:09:28+5:302024-11-04T09:10:53+5:30
Mumbai Diwali News: दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. गेल्या चार दिवसांत फटाके फोडताना ५० पेक्षा अधिक जण भाजल्याने जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काही जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे, तर पाच जणांना पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
मुंबई - दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. गेल्या चार दिवसांत फटाके फोडताना ५० पेक्षा अधिक जण भाजल्याने जखमी झाले आहेत. या जखमींपैकी काही जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे, तर पाच जणांना पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक लहान मुले आहेत. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.
खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांंवर ओपीडीमध्ये उपचार करून सोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेच्या केईएम रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. तर, दोघांना दाखल करण्यात आले आहे. शीव रुग्णालयात १२ जणांवर उपचार करण्यात आले. दोघे रुग्णालयात दाखल केले आहेत. बहुतांश रुग्ण हे भाजलेले आहेत. कूपर रुग्णालयामध्ये दोघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. नायर रुग्णालयात ९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जखमींपैकी एकाला रुग्णालयात दाखल केले असून, उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सर्व रुग्णालयांच्या प्रमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
डोळ्याला दुखापत
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तिघांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. जी. टी.मध्ये तिघांवर उपचार करून घरी सोडले. जे. जे. रुग्णालयात चौघे आले होते, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तीन जणांवर बाह्यरुग्ण विभागातच उपचार करून घरी सोडण्यात आले, तर एकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.