मुंबई - इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या मुंबईतील १२ व्या पर्वाला ८ ते ११ फेब्रुवारी रोजी वरळी येथील नेहरू सेंटर मध्ये सुरुवात होत आहे. या निमित्ताने ५५० चित्र-शिल्पकार एकत्र येत असून नेहरू सेंटर येथे ५००० कलाकृती डिस्कवरी ऑफ इंडीया बिल्डींगच्या तळ मजला आणि दुसऱ्या मजल्यावर १५० स्टॉल्स मधून विविध कलाकृतींचा खजिना उलगडणार आहे.
या महोत्सवात पन्नास कलादालनांमधील ५५० कलाकारांच्या ५००० कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. तसेच ५० शहरांमधील ३०० स्वतंत्र कलाकार व कलादालनांतर्फे २०० नामवंत चित्रकार या महोत्सवात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात तैलचित्रे, अॅक्रिलिकमधील चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शिल्पे आणि ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्ह्ज, अॅबस्ट्रॅक्ट चित्रे या शोमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतील. इंडिया आर्ट फेस्टिव्हलमध्ये चित्र- संगीताचा मेळ असलेले फ्यूजन शो आयोजित केले जाणार आहेत; त्यात बासरी-तबला वादन, जलतरंग-तबला वादन व सितार-तबला वादन होणार असून दर दिवशी एक चित्रकार प्रत्यक्ष व्यासपीठावर प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्यात प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक, गणपत भडके, व राघू नेवारे यांचा समावेश आहे. गॅलरी विभागात आर्टदेश फाउंडेशन, आर्टव्हिस्टा, म्रिया आर्ट्स, द बॉम्बे आर्ट सोसायटी आणि स्टुडीओ३ गॅलरी या मुंबईतील गॅलरी आपल्या उत्तम कलाकारांच्या कलाकृती या ठिकाणी सादर करणार आहेत.
एकाच छताखाली समकालीन कलाकृतींचा मेळ
उदयोन्मुख, प्रस्थापित आणि दिग्गज कलाकारांनी घडविलेल्या समलकालीन कलाकृती घेण्यासाठी इंडिया आर्ट फेस्टिव्हल हा प्रमुख स्रोत असून एका वर्षानंतर कलामहोत्सव पुन्हा कला रसिकांसमोर येत आहे. कलारसिक आणि कलाग्राहकांची संख्या मुंबई, बंगलोर आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात असून इंडिया आर्ट फेस्टिव्हलच्या वार्षिक आवृत्ती मुंबईशिवाय दिल्ली व बंगलोर येथे होत असून आर्ट फेस्टीव्हलच्या या महानगरांमधील वाढीसाठी हे मुलभूत कारण आहे. - राजेंद्र पाटील , संचालक, इंडिया आर्ट फेस्टिव्हल
दिग्गज कलाकारांचा सहभाग
महोत्सवात भन्नाट अंतर्दृष्टी असलेले कलाकार या वर्षी गैलरी ग्यानी आर्ट सिंगापूर, बिओंड द कॅनव्हास, सहज सृजन आर्ट गॅलरी, ग्रेस्केल, स्टुडियो ३, तूलिका आर्ट्स, आणि ऱ्हिदम आर्ट आशा मोठमोठ्या कलादालनांनी सादर केले आहेत. त्यात नामवंत चित्रकार अतुल दोडिया, मनु पारेख, परेश मैती, सीमा कोहली, गुरुदास कामत, जतीन दास, जोगेन चौधरी, लक्ष्मा गौड, कृशन खन्ना, जी आर इरण्णा, अंजली इला मेनन व इतर जवळपास १०० प्रख्यात चित्र-शिल्पकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. काही तरुण चित्रकार नागेश घोडके, विवेक कुमावत, आनंद पांचाल, दिनकर जाधव, सुबोध पोद्दार, अशोक राठोड, ऋता इनामदार, नलिनी जोशी, आणि अशा अनेकांच्या कलावंतांच्या कलाकृती आहे.