मुंबई- राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. आता आंदोलन तीव्र झालं आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिफायनरी विरोधात मोर्चा काढण्याचं ठरवले होते. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बारसू रिफायनरीला ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, आज आंदोलनासाठी काही बाहेरील लोक आहेत. तिथे आता शांतता आहे, तिथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही. आम्ही पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. पण कुठल्याही परिस्थित शेतकऱ्यांवर अन्याय करुन कुठलेही काम होणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत तिथल्या लोकांशी बोलत आहेत. अधिकारी शेतकऱ्यांना प्रकल्पाची माहिती देतील, शेतकऱ्यांच्या संमतीनेच प्रकल्प पुढे जाईल, हे सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
रिफायनरीविरोधात मोर्चाची तयारी, खासदार विनायक राऊतांसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
"प्रकल्प आल्यानंतर स्थानिक लोकांनाच फायदा होणार आहे. जोरजबरदस्तीने सरकार काम करणार नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून हा प्रकल्प बारसूला होऊदे म्हणून सांगितलं होते आणि आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर या प्रकल्पला हे विरोध करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
"तुम्ही उद्योग राज्याबाहेर जात आहेत म्हणून आरोप करत आहात आणि इकडे ७० टक्केपेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा असुनही तुम्ही बारसू रिफायनरीला विरोध करत आहात, असंही शिंदे म्हणाले. १०० टक्के लोकांचा विरोध असता तर आपण समजून घेतले असते पण बारसू येथील ७० टक्के लोकांचा पाठिंबा आहे. बारसू येथील गावकऱ्यांनी शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.