मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या हजारांच्या पलीकडे नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १,०४५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून मुंबईतील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ४,५५९ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
दिवसभरात ५१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ७७,३६,७९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्युदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ८,०९,७७,९०८ नमुन्यांपैकी ०९.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८९,२१२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ४७ हजार ८६१ इतका आहे.
मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील पाच जिल्ह्यांत म्हणजेच जालना, परभणी, बुलडाणा, गोंदिया, बीड, लातूर एकही कोरोनाचा सक्रिय रुग्ण नाही. तर अन्य वीस जिल्ह्यात १ ते १० दरम्यान कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची नोंद आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी मुंबईत सर्वाधिक ३,३२४, ठाण्यात ५५५, पुण्यात ३७२, रायगड १०६ रुग्ण उपचाराधीन आहेत.