Join us

सात हजारांहून अधिक बॅनर्स, पोस्टर्स काढले; आचारसंहिता लागू होताच पालिकेचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 1:23 PM

आचारसंहितेत विद्रूपीकरण कायदा १९९५ नुसार ही कारवाई सुरू असून, सर्व राजकीय पक्षांनीदेखील यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाल्यानंतर पालिकेने अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सवरील कारवाईला तात्काळ सुरुवात केली आहे. पालिकेच्या अनुज्ञापन विभागाने मंगळवार ते गुरुवार अशा तीन दिवसांमध्ये संपूर्ण मुंबईत एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी काढून टाकले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाई करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

आचारसंहितेत विद्रूपीकरण कायदा १९९५ नुसार ही कारवाई सुरू असून, सर्व राजकीय पक्षांनीदेखील यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. या शिवाय ज्या ठिकाणी परवानगी असेल त्या ठिकाणीच अधिकृत परवानगी घेऊन जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या काळात संपूर्ण मुंबईत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्य काढून टाकण्याच्या सूचना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्या आहेत.

..अशी करता येणार तक्रार सी व्हिजिल ॲपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघनासंदर्भातील तक्रार करण्याची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत केले जाते. त्याशिवाय मतदारांना १९५० या हेल्पलाइन क्रमांकाचाही पर्याय पुरविण्यात आला आहे.   

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका