मुंबई : शिमग्यासाठी सुमारे २ लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी महामंडळ, तसेच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली होती. पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या २ दिवसांत दाखल होणार आहेत.
होळी आणि शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा सण आहे. यात गावोगावी पारंपरिक होळी पेटवली जाते, तसेच शिमगोत्सव अंतर्गत नाचगाणी, पारंपरिक ढोल-ताशांचे वादन, विविध देखावे आणि जत्रा भरवण्यात येते. या सणासाठी प्रत्येक वर्षी लाखो मुंबईकर कोकणात जातात. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, या वर्षी एसटी महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने विशेष तयारी केली होती.
एसटीच्या दररोज ६३ गाड्या महामुंबईतून कोंकणात जातात. वाढती मागणी पाहता यावर्षी एसटी महामंडळाने १० मार्च ते १५ मार्च या कालावधीत कोंकणात जाणाऱ्यांसाठी १९५ विशेष गाड्यांची व्यवस्था केली होती. त्यापैकी १२ मार्च रोजी सर्वाधिक एसटी कोकणासाठी सोडण्यात आल्या होत्या.
५० अनारक्षित ट्रेन्स
मध्य रेल्वेकडून देखील प्रवाशांच्या सोयीसाठी साधारण ५० पेक्षा अधिक विशेष तसेच अनारक्षित ट्रेन चालविण्यात आल्या आहेत.
यासोबतच पनवेल- चिपळूण दरम्यान अतिरिक्त मेमू देखील चालविण्यात आल्या आहेत. तसेच, खासगी वाहतूकदारांकडून देखील नियमित गाड्यांपेक्षा ३० ते ४० टक्के अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या असल्याची माहिती वाहतूकदारांकडून देण्यात आली.
पालखी सोहळ्याची लगबग
होळी संपल्यानंतर आता कोकणात पारंपरिक पालखी सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत आणखी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, एसटी महामंडळ, रेल्वे आणि खासगी वाहतूकदारांकडून अजून काही अतिरिक्त वाहतूक सोडण्यात येणार आहे.