Join us  

आॅगस्टपासून जास्त पाणी

By admin | Published: May 22, 2016 2:29 AM

मर्यादित जलसाठ्यामुळे गेल्या वर्षीपासून २० टक्के पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे़ पाणीकपात, लेक टॅपिंग, जल वितरण व्यवस्थेत सुधारणा

मुंबई : मर्यादित जलसाठ्यामुळे गेल्या वर्षीपासून २० टक्के पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे़ पाणीकपात, लेक टॅपिंग, जल वितरण व्यवस्थेत सुधारणा आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुन:प्रक्रिया प्रकल्पातून पाण्याची बचत झाली आहे़ त्यामुळे या वर्षी चांगला पाऊस झाल्यास आॅगस्टपासून मुंबईला दररोज २५५ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकणार आहे़मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ मात्र गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे आॅगस्ट २०१५पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू आहे़ ही कपात वर्षभर सुरू असल्याने पाणी वितरण व्यवस्थेच्या टोकाला आणि टेकडीच्या पायथ्याशी, डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ त्यामुळे अन्य मार्गाने पाण्याची बचत करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे़वैतरणा नदी व धरणांच्या माध्यमातून पाण्याची बचत तसेच जलशुद्धीकरण केंद्रात वाया जाणाऱ्या पाण्यावर पुन:प्रक्रिया करून पाण्याची बचत सुरू आहे़ जल वितरण व्यवस्थेत अशा पद्धतीने सुधारणा करण्याचा प्रकल्प जुलै २०१६पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ त्यामुळे जूननंतर चांगला पाऊस झाल्यास २० टक्के पाणीकपात रद्द केल्यानंतर दररोज २५५ दशलक्ष लीटर जादा पुरवठा करणे पालिकेला शक्य होईल, असे जल अभियंता खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)