मुंबईतील जादा पाणीकपातीचे संकट टळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:15 AM2019-06-13T08:15:33+5:302019-06-13T08:15:51+5:30
तलावांमधील जलसाठा कमी होत चालल्याने पाणीटंचाईची अधिकच झळ मुंबईकरांना बसत आहे. दरम्यान, भातसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात विसर्ग झडपांत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता.
मुंबई : भातसा धरणातील तांत्रिक बिघाडामुळे उद्यापासून २५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात येणार होती. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती करून हा प्रश्न सोडविण्यात आल्यामुळे मुंबईकरांना अतिरिक्त पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. ही कपात आवश्यकतेनुसार १० ते १५ टक्के असेल.
मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या पावसाळ्यात तलावांमध्ये कमी पाणी जमा झाल्यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तलावांमधील जलसाठा कमी होत चालल्याने पाणीटंचाईची अधिकच झळ मुंबईकरांना बसत आहे. दरम्यान, भातसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात विसर्ग झडपांत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. दुरुस्तीनिमित्त १२ ते १४ जून असे तीन दिवस २५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार होती. मात्र दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात आल्यामुळे आता मुंबईकरांना २५ टक्के अतिरिक्त पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही. परंतु, काही भागांमध्ये या काळात १० ते १५ टक्के कमी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे जल अभियंता विभागातून स्पष्ट करण्यात आले.