Join us  

तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:01 AM

शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच; महापालिका नियोजनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाच्या अनियमिततेमुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत मिळून फक्त ५.२८ टक्के पाणीसाठा उरला असल्याने मुंबईसमोर पाणीसंकट उभे ठाकले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात १० टक्के पाणीकपात लागू असताना पुढे पाण्याचे कसे नियोजन करणार, असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे आहे. पावसाची अनियमितता कायम राहिल्यास तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठ्यात काही टक्क्यांची कपात करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. 

दरम्यान, यावर अद्याप पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये पावसाने दिलेल्या ओढीमुळे मुंबई पालिकेने २० टक्के पाणीकपात केली होती आणि औद्योगिक वापराच्या पाण्यात ५० टक्के कपात लागू केली होती. यंदा दमदार पावसाची अपेक्षा असताना अद्याप तरी धरण क्षेत्रात तो अनियमित आहे. परिणामी, पाणीसाठ्यात विशेष भर पडलेली नाही. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत मिळून केवळ ७६ हजार ४२५ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. आधीच १० टक्के पाणीकपात करण्यात आल्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन धरणांमधून राखीव कोट्यातील जलसाठ्यातून पाणी उपलब्ध केले जात आहे. मात्र, त्यावरही मर्यादा असून हा साठा ३१ जुलैपर्यंतच पुरेल इतकाच आहे.

तक्रारी वाढल्या...या महिन्यात पाण्याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी नागरिक रस्त्यावरही उतरत आहेत. डोंगर उताराच्या काही भागांत तर टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. अशा भागांमध्ये पालिका प्रशासनाकडून ही टँकरची व्यवस्था देण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या पाणीकपातीचा विचार नाही धरण क्षेत्रात पाऊस झाला तरच सध्याचे चित्र पालटू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तूर्तास पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचा विचार नाही. मात्र, दोन ते तीन दिवसांत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, स्पष्ट करण्यात आले.

राखीव कोट्यातून केलेला पाणीपुरवठाअप्पर वैतरणा : ४२,२६३ दशलक्ष लीटरभातसा : २१,४६८ दशलक्ष लीटर (राखीव जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरण्याएवढा) 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकापाणी