Join us

मुंबईतील ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद; मुंबई पोलिसांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 7:47 AM

राज्यासह देशातील परिस्थिती पाहता भोंग्यांच्या मुद्द्यावरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत सोशल मीडियावरील हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे.

मुंबई : राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला असताना, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत परवानगीचा अर्ज उपलब्ध आहे. ज्याला त्यांचा वापर करायचा असेल, त्याने अर्ज करावा, त्याच्या वापराबाबत तपासणी करून परवानगी देण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

राज्यासह देशातील परिस्थिती पाहता भोंग्यांच्या मुद्द्यावरून समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत सोशल मीडियावरील हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी  जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एकूण  १२,८०० आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या, तर २२ खाती बंद केली आहेत. राज्यातील धार्मिक वातावरण सलोख्याचे राहावे यासाठी समाजमाध्यमांवर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाकडून सांगण्यात आले, तर दुसरीकडे, महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीचे पथक दिवसाला अशा स्वरूपाच्या ३० ते ३५ पोस्ट डिलीट  करत आहेत. राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते, असेही सायबर पोलिसांच्या निरीक्षणात समोर येत आहे.

मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात सर्व धर्माच्या प्रतिनिधींची पोलीस आयुक्तालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषणाबाबच्या आदेशांची माहिती देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनीही शहरातील मशिदींचे सर्वेेक्षण केले होते. त्यात मुंबईतील ७२ टक्के मशिदींनी पहाटे पाच वाजता भोंग्यांचा वापर करणे बंद केल्याचे निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

भोंग्यांबाबत बैठक पोलिसांची भोंग्यांच्या नियमावलीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात पोलीस महासंचालकांसह राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासह धार्मिकस्थळांवर ध्वनिक्षेपकांचा वापर यावर चर्चा झाली. ध्वनी प्रक्षेपकांबाबतच्या नियमांचे पालन याबाबत पोलीस महासंचालक एक अहवाल सादर करणार आहे.  

 

टॅग्स :मशिदमुंबई