मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; दारे-खिडक्याही बंद ठेवा, प्रदूषणाच्या वाढत्या धोकादायक पातळीवर आता टास्क फोर्सचा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:24 AM2023-11-08T06:24:11+5:302023-11-08T07:59:18+5:30
वाढत्या प्रदूषणाने संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याने आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारांवरच निर्बंध येण्याची स्थिती आली आहे. वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी माॅर्निंग वाॅक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे- खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तसेच प्रदूषणाचा आणखी अभ्यास करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करणे व आराेग्य राखण्यासाठी आराेग्य विभागाने ‘टास्क फाेर्स’ची स्थापना करण्याचे निर्देश राज्याच्या आराेग्य आयुक्तांनी दिले आहेत.
वाढत्या प्रदूषणाने संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी कठोर उपाययोजना योजण्यास सुरुवात केली आहे.
ज्येष्ठांसह गरोदर माता, लहान मुले, पोलिस, रिक्षाचालकांना धोका
राज्यातील सध्याचे हवामान ज्येष्ठ नागरिक, पाच वर्षांखालील लहान मुले, गरोदर महिला, व्याधींनी त्रस्त व्यक्ती, वाहतूक पोलिस, सफाई कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले यांना हानिकारक असून, योग्य खबरदारी न घेतल्यास मृत्यू ओढावू शकतो, असा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे.
टास्क फोर्समध्ये कोण?
टास्क फाेर्समध्ये बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील फुप्फुसराेग विभागाचे प्रमुख, पुणे पालिकेच्या आराेग्य विभाग व पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, मुंबईतील पर्यावरण किंवा वैद्यकीय तज्ज्ञ, साथराेग विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
९५ विशेष पथके
मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाची अत्यंत गंभीर दखल घेतल्यानंतर पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. पालिकेने २४ वॉर्डात आतापर्यंत ९५ विशेष पथके स्थापन केली असून ती बांधकामांवर लक्ष ठेवून आहेत.
वायुप्रदूषण वाढल्यामुळे राज्यस्तरीय टास्क फाेर्सची स्थापना आठवडाभरात करण्यात येणार आहे. या टास्क फाेर्सच्या प्रतिनिधींकडून वायुप्रदूषण कमी करणे आणि त्याचबराेबर आराेग्यविषयक काय काळजी घ्यायला हवी.
- डाॅ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, साथराेग विभाग, पुणे