Join us

नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त मुंबईत निर्भय मॉर्निंग वॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:44 PM

मुंबईत ८ ठिकाणी निर्भय वॉकचं आयोजन

मुंबई : डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत सकाळी 7 ते 9 या वेळेत 8 ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. घाटकोपर मध्ये भटवाडी ते सर्वोदय हॉस्पिटल व गणपती मंदिर ते घाटकोपर स्टेशन या दरम्यान दोन ठिकाणी; तर कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जोगेश्वरी येथे इस्माईल युसूफ कॉलेज व दहिसर येथे जरी मरी गार्डन या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यात आले. दादरमध्ये नायगाव मधील देवरुखकर मार्गावरील संविधान चौक येथून राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पहिल्या मॉर्निंग वॉक ला सुरुवात झाली. पुढे वरळी सी फेसला आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन पुतळ्याजवळून दुसरा मॉर्निंग वॉक सुरू झाला व शेवटी शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या मार्गावरून शेवटचा मॉर्निंग वॉक करून चैत्यभूमीवर मुंबईतील या सर्व मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते, समविचारी, हितचिंतक व सजग नागरिक यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास अजूनही पूर्ण होत नाही व खुनाच्या सुत्रधारांचाही शोध लागत नाही याबाबत निषेध व्यक्त केला व जोपर्यंत खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ही मागणी नेटाने लावून धरू व याबाबत अधिकाधिक जनजागृती करू असा कृतीशील निर्धार व्यक्त केला. घाटकोपरमध्ये शहाजी पाटोदेकर व संदेश बालगुडे; कुर्ल्यामध्ये नंदना गजभिये व अपर्णा दळवी; दादरमध्ये योगेश जाधव, विजय परब, नरेंद्र राणे; जोगेश्वरी मध्ये रूपेश शोभा, सचिन नाचणेकर व दुर्गा गुडीलू आणि दहिसरमध्ये यश सूर्यवंशी व गणेश सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी उपस्थित महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या या कृतीशील निर्धाराचे कौतुक केले. 

राज्यभरातून व्यक्त होणाऱ्या कार्यकर्ते व सजग नागरिकांच्या या निर्धाराबाबत राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कौतुक करत हा कृतीशील निर्धार आपण असाच शेवटपर्यंत चालू ठेवू व खुनाचा तपस पूर्ण होऊन मारेकरी व सूत्रधार यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करत राहू असे आवाहनही केले. राज्यभरातून मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व प्रत्यक्ष ईमेलद्वारे खुनाच्या तपासात होणारी दिरंगाई व त्याचा पाठपुरावा याबाबत निवेदने दिलेली आहेत असेही अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर जादूटोणा विरोधी कायदा झाला, पण त्याचे नियम अद्याप बनविले गेले नाही. ते त्वरीत बनवावे अशी मागणी सुद्धा मा.मुख्यमंत्री नामदार उध्दवजी ठाकरे,मा.नामदार गृहमंत्री दिलीप वळसेपाटिल,सामाजिक न्याय विभाग मंत्री मा.नामदार धनंजय मुंडे याना करण्यात आलेली आहे.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकर