Join us

मलेरियातील मृत्युदर घटतोय

By admin | Published: April 25, 2015 4:55 AM

मलेरियाच्या तापामुळे पाच वर्षांपूर्वी मुंबईकर चांगलेच फणफणलेले होते. २००९ आणि २०१० या दोन्ही वर्षांत रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढती होती

पूजा दामले, मुंबईमलेरियाच्या तापामुळे पाच वर्षांपूर्वी मुंबईकर चांगलेच फणफणलेले होते. २००९ आणि २०१० या दोन्ही वर्षांत रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढती होती. पण आता मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत ८८ टक्क्यांनी, तर मृत्यूच्या संख्येत ८७ टक्क्यांनी घट झाली असल्याचे साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांचा टक्का वाढीस लागतो. साथीचे आजार आटोक्यात राहावे, यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. पण २००९ मध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येने आणि मृत्यूंनी उच्चांक गाठला होता. २०१० मध्येही मलेरियाच्या साथीचा जोर कमी झाला नाही. २००९ मध्ये १९८ तर २०१० मध्ये १४५ जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता. २०१० मध्ये वर्षभरात मलेरियाचे ७६ हजार ७५५ रुग्ण आढळून आले होते. मलेरियाला आळा घालण्यासाठी महापालिकेने पंचसूत्री योजना आखली होती. याला यश मिळाले आहे. २०१४ मध्ये मलेरियाचे फक्त ९ हजार ६८ रुग्ण आढळून आले आहेत. २०१० मध्ये मलेरियामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. या एका वर्षात मलेरियामुळे १४५ जणांना जीव गमवावा लागला होता. २०११ पासून उपाययोजना आणि जनजागृतीच्या कार्यक्रमांमुळे मृतांच्या संख्येत घट होत गेली आहे.