मुंबई: तुम्ही धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या ज्या ज्या मशिदींच्या भोंग्यांमधून अजान, बांग ऐकू येईल, त्या त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा. काय त्रास होतो, ते त्यांनाही कळू दे, अशा शब्दांत राज यांनी इशारा दिला आहे. एका पत्राच्या माध्यमातून राज यांनी सर्व हिंदूंना मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे.
देशात इतकी कारागृहं नाहीत की...देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.
एकदाचा फैसला होऊन जाऊ देमहाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे.
...तर धर्मानंच उत्तर देऊसर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानच दिलं जाईल, असा इशारा राज यांनी दिला आहे.