मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला होता. जर भोंगे उतरले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ४ मे रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. मनसेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि धरपकड सुरू केली होती.
मनसेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या होत्या. परंतु मुंब्रा, माहिम, भिवंडी, पनवेल, वांद्रे यासारख्या मुस्लीम बहुल भागात मशिदीवर भोंग्याविना अजान करण्यात आली. त्यामुळे मनसेने याठिकाणी हनुमान चालीसा लावली नाही. त्यासोबत मुस्लीम समाजाने दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे मनसेने त्यांचे आभार मानले. त्याचपार्श्वभूमीवर आता राज ठाकरे(Raj Thackeray) संध्याकाळी शिवतीर्थवर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरीसह अनेक पदाधिकारी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.
राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माहित नाहीत – संजय राऊत
बाळासाहेब ठाकरेंनी लाऊडस्पीकर काढण्यास सांगितले तेव्हाच भोंगे बंद झाले होते. आज आंदोलन कुठेच झालं नाही मग यशस्वी होण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात शांतता आहे. ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं त्यांनी शिवसेनेला शिकवू नये. मनसेला हिंदुत्व शिकवणाऱ्यांची डिग्री तपासली पाहिजे. त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती नाहीत असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेला लगावला. तर संजय राऊत(Sanjay Raut) यांनी बेगडी हिंदुत्व कुणाचं आहे हे जनतेला माहिती आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं प्रत्युत्तर मनसेने दिलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक
मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांनी काही वेळापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी परिस्थितीचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे.