मुंबईत छळताहेत डास, झालाय सुळसुळाट...; मलेरियाचे ७२१ रुग्ण, ६८५ रुग्णांना डेंग्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:10 PM2023-09-06T12:10:17+5:302023-09-06T12:10:37+5:30
पाण्याच्या डबक्यांमध्ये या डासाची उत्पत्ती होत असते.
मुंबई : गेली काही दिवस शहरात अधूनमधून पाऊस पडत आहे. हे वातावरण डासांसाठी पोषक असते. त्यामुळे या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. या डासांच्या चाव्यामुळे गेल्या काही दिवसात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या पावसाळी आजारांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये डासांपासून होणाऱ्या आजाराच्या रुग्णसंख्येत ऑगस्ट महिन्यात वाढ दिसून आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मलेरियाचा आजार प्लेसमोडियम या डासाच्या प्रजातींमुळे, तर डेंग्यू आणि चिकुनगुनिया हा आजार एडिस प्रजातीच्या चाव्यामुळे होत असतो.
पाण्याच्या डबक्यांमध्ये या डासाची उत्पत्ती होत असते. अनेकवेळा ही डबकी नष्ट करण्यासाठी महापालिकेचा कीटकनाशक विभाग फवारणी करत असत. काही नागरिक त्या डबक्यामध्ये केरोसिन किंवा अन्य कीटक मारणारी रसायने टाकून डासांची उत्पत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असतात.
सप्टेंबरमधील आकडेवारी
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन दिवसातील आकडेवारी पाहिली असता तीन दिवसात मलेरियाचे ५७, डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले आहे.