Join us

टेरेसवरच्या सोलर पॅनलमध्ये डासांचा मुक्काम; साचलेल्या पाण्यातील अळी ठरताहेत धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:03 AM

मुंबईत दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत असून, या इमारतींना नव्या तरतुदीनुसार टेरेसवर सोलर पॅनल बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस इमारतींची संख्या वाढत असून, या इमारतींना नव्या तरतुदीनुसार टेरेसवर सोलर पॅनल बंधनकारक करण्यात आले आहे. हे सोलर पॅनल वीजनिर्मितीसह घातक ठरत आहेत. सोलर पॅनलच्या खाली पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू, मलेरिया पसरवत आहेत. त्यामुळे या पॅनलखाली पाणी तर तुंबणार नाही ना याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत यावर्षी पावसाने उशिरा एंट्री केली असली तरी सुरुवातीपासूनच पावसाळी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरात डेंग्यूचे ३५३, मलेरियाचे ६७६, तर गॅस्ट्रोचे तब्बल १,७४४ रुग्ण आढळले होते. डेंग्यू, मलेरियासारखे आजारही जीवघेणे ठरत असून कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूर फवारणी मोहीम व्यापकपणे राबविण्यात येते. मात्र मुंबईच्या उंचच उंच टॉवरमध्ये टेरेसवर सोलर पॅनल बसविण्यात आले असून, कीटकनाशक विभागाकडून त्याची झाडाझडती घेतली जात आहे. 

या सोलर पॅनलच्या खाली साचलेल्या पाण्यात डास अळ्या घालत असून त्या धोकादायक ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे पाणी साचू देऊ नये याची सोसायट्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

लवकरच महापालिका अशी सोलर पॅनल असेलेली सर्व ठिकाणे हुडकून त्याठिकाणची तपासणी करणार असल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले.  

१ जानेवारी ते १५ जुलैपर्यंत सापडलेली डासांची उत्पत्ती स्थाने  १,९९०५९ ॲनाफिलीस डासांची स्थाने  ४५६७ एडिस डासांची स्थाने  ४१९७८ नष्ट करण्यात आलेले स्रोत (टायर)  ७२५५ नष्ट करण्यात आलेल्या करवंट्या,  भंगार साहित्य : २२६१२१