मुंबई : परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होताना आढळल्यामुळे त्यांना पालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. 1क् दिवसांमध्ये रुग्णालय परिसराची स्वच्छता तसेच साचलेले पाणी काढल्याचे केईएम रुग्णालयाने 7 नोव्हेंबर रोजी जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात पाण्याच्या पाइपलाइनमधून अजूनही पाणी गळत असल्यामुळे आता रुग्ण डेंग्यूच्या डासांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वापरत आहेत.
रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत दर्शनी भागातील साचलेले पाणी, कचरा काढून टाकला. मात्र, वॉर्डच्या मागच्या बाजूंना, इमारतीच्या मागच्या बाजूंकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे अजूनही रुग्णालय परिसरात काही ठिकाणी साचलेले पाणी, गळके पाइप दिसत आहेत. ही ठिकाणो वॉर्डच्या बाजूलाच असल्याने महिला, बालक आणि त्वचा विभागातील काही रुग्णांनादेखील डेंग्यूची लागण झाली.
केईएम रुग्णालयात गेल्या 2 वर्षापासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक ठिकाणच्या पाइपलाइन फुटलेल्या आहेत. या पाइपलाइनमधून वाहणारे पाणी इतरत्र पसरत असल्यामुळेच मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा प्रकारे पाणी साचू नये म्हणून प्रशासनाने पाण्याचा दाब कमी केला आहे.
रुग्णालयाचा परिसर खूप मोठा आहे. येथे रोज हजारो रुग्ण आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक येत असतात. यामुळे सकाळी स्वच्छता केली तरीही पुन्हा घाण असतेच. हे कमी करण्यासाठी आम्ही सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. जुन्या इमारतीमध्ये जाणारे एक प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाइकांवर आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही उपाय करीत असल्याचे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासन, कर्मचारी स्वच्छता ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. मात्र, ही सर्वाची जबाबदारी आहे, याचे भान सगळ्यांनाच हवे. कारण पिण्याच्या पाण्याच्या जागीही डेंग्यूच्या डासांची पैदास आढळली आहे. या जागी साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले तर दोष कोणाला
द्यायचा, असा सवाल डॉ. पारकर यांनी केला आहे.
(प्रतिनिधी)
त्वचा विभागातील एका रुग्णाला डेंग्यू झाला होता. यामुळे त्याला उपचारासाठी दुस:या वॉर्डमध्ये पाठवण्यात आले होते. त्याचा डेंग्यू बरा झाल्यावर त्याला पुन्हा त्वचा विभागात उपचारासाठी आणले गेले. मी या वॉर्डमध्ये उपचार घेण्यासाठी आल्यावर पुन्हा खाली साचलेले पाणी दिसले. यामुळे मला पुन्हा डेंग्यू होण्याची भीती वाटल्याने मला घरच्यांनी मच्छरदाणी आणून दिली असल्याचे रुग्णाने सांगितले. अशा प्रकारे काही रुग्णांनी डासांपासून वाचण्यासाठी स्वत:च मार्ग काढलेला आहे.