ग्राहकांच्या प्रतीक्षेतील सर्वाधिक घरे मुंबई पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 04:38 PM2020-10-17T16:38:08+5:302020-10-17T16:38:34+5:30
Awaited Homes : देशातील तयार घरांपैकी ५६ टक्के घरे मुंबई पुण्यात
मुंबई : जुलै ते आँगस्ट या तिमाहीत घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढू लागले असले तरी आजही देशातील सात प्रमख शहरांमध्ये तब्बल ७ लाख २३ हजार तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणे यापैकी ५६ टक्के म्हणजेच ४ लाखांपेक्षा जास्त घरे ही मुंबई महानगर आणि पुण्यातील आहेत. या घरांच्या विक्रीचे मोठे आव्हान बांधकाम व्यावसायिकांसमोर असून त्यांची प्रमुख भिस्त येत्या दीड दोन महिन्यांतील उत्सव काळ आणि मार्च, २०२१ पर्यंतची मुद्रांक शुल्क सवलतीवर आहे.
जून महिन्याच्या अखेरीस मुंबई पुण्यात बांधकाम पूर्ण झालेली आणि वापर परवाना मिळालेली अनुक्रमे २,७६,४९२ आणि १,३५,१२४ अशी ४ लाख ११,६१६ घरे विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यानंतरच्या तीन महिन्यांत घरांच्या विक्रीच्या तुलनेत नव्या घरांची संख्या कमी होती. त्यामुळे विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या ४,०४,८८० इतकी कमी झाली आहे. दिल्लीत १५ टक्के म्हणजेच १ लाख ८ हजार आणि बंगळूरू येथे सुमारे ७२ हजार घरे विक्रीसाठी सज्ज आहेत.
देशात कोरोना दाखल झाल्यानंतर एप्रिल ते जून या तिमाहीत या सात शहरांमघ्ये जेमतेम ५,३८२ घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ती संख्या ८५ टक्क्यांनी वाढून ३५,१३२ पर्यंत पोहचली आहे. त्यात सर्वाधिक वाटा सप्टेंबर महिन्यांतील खरेदीचा आहे. ४५ लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या खरेदीसाठी सरकारकडून आयकरातली विशेष सवलत दिली जात असल्याने त्या घरांची विक्री वाढल्याचे आकडे सांगतात. तर, जास्त किंमत असलेल्या घरांच्या किंमती कमी झाल्यामुळे तिथली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते अशी धारणा उच्चभ्रूंमध्ये झाली असून त्यामुळे या घरांच्या विक्रीलाही चालना मिळताना दिसत आहे.
घरांच्या विक्रीसाठी ४३ महिने : सप्टेंबर, २०१९ मध्ये विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या यंदाच्या तुलनेत कमी होती. घरांच्या विक्रीची जी गती त्यावेळी होती त्यानुसार शिल्लक घरे विक्रीसाठी सुमारे २३ महिने लागतील असा अंदाज होता. मात्र, यंदा घरांच्या संख्येतही वाढ झाली असून त्यांच्या विक्रीची गतीसुध्दा मंदावली आहे. त्यामुळे या ७ लाख घरांच्या विक्रीसाठी किमान ४३ महिने लागतील असा अंज आहे.