मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील अग्रणी ५० पैकी ३६ कंपन्यांमध्ये या वर्षात लैंगिक छळाच्या ५८८ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक २४४ प्रकरणे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांमधील असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
शेअर बाजाराच्या निर्देशांकाला निफ्टी म्हणतात. या निफ्टीमध्ये ५० कंपन्या आहेत. यापैकी विप्रो लिमिटेड या आयटीतील कंपनीत जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत लैंगिक छळाची सर्वाधिक १०१ प्रकरणे समोर आली तर इन्फोसिसमध्ये ७७, टीसीएसमध्ये ६२ व एचसीएल टेक्नॉलॉजिसमध्ये ४ तक्रारी आल्या. भारतात फक्त २६ टक्के महिला कर्मचारी आहेत. पण आयटीमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. महिलांच्या लैंगिक छळाच्या सर्वाधिक तक्रारीही याच क्षेत्रातील आहेत. अशा प्रकरणांमध्ये आयटीपाठोपाठ बँकिंग व वित्त क्षेत्राचा क्रमांक आहे. या क्षेत्रात या वर्षी अशा १३० तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये ९९ प्रकरणांसह आयसीआयसीआय बँक अग्रस्थानी आहे. अॅक्सिस, कोटक महिंद्रा व एचडीएफसी या खासगी बँकांचा त्यात समावेश आहे. स्टेट बँकेतील या प्रकरणांचा आकडा १८ आहे. तेल व नैसर्गिक वायू किंवा कार्गो, बंदरे या क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वांत कमी आहे. पण त्या क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणेही सर्वांत कमी असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.
महिलांच्या लैंगिक छळात उद्योग क्षेत्रसुद्धा मागे नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.