मुंबईत जन्मतात सर्वाधिक क्षयबाधित बालके

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:32 AM2019-02-17T07:32:05+5:302019-02-17T07:32:34+5:30

राज्यातील गेल्या वर्षभरातील आकडेवारी । १,४४१ बाळांना जन्मत: क्षयरोग

The most damaged babies born in Mumbai | मुंबईत जन्मतात सर्वाधिक क्षयबाधित बालके

मुंबईत जन्मतात सर्वाधिक क्षयबाधित बालके

Next

स्नेहा मोरे 

मुंबई : देशात दरवर्षी लाखो लोकांचा क्षयरोगाने (टीबी) मृत्यू होतो. त्यात गेल्या काही वर्षांपासून शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या नवजात बालकांमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. जन्मत: क्षयरोग झाल्यामुळे बऱ्याचदा या बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मार्च २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत राज्यात १ हजार ४४१ बालकांना जन्मत: क्षयरोग झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. राज्यभरात मुंबईत सर्वाधिक म्हणजेच ६५९ बालकांना जन्मत: क्षयरोग झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षभरात शासकीय रुग्णालयात १,३७१ बालकांना तर खासगी रुग्णालयात ७० बालकांना जन्मत:च क्षयाची बाधा झाली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माहितीनुसार, जन्मत: क्षयरोगाची लागण झालेल्या बालकांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे. मुंबईतील ६५९ पैकी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या ६५८ तर खासगी रुग्णालयात जन्मलेल्या एका बालकाला क्षयरोगाची लागण झाल्याचे उघडकीस आले. यात शहरातील १५६ तर ग्रामीण भागातील ५०३ बालके आहेत. मुंबईखालोखाल पुण्यात २८४, ठाण्यात ७९ तर पालघर जिल्ह्यात ६० बालकांना जन्मत: क्षयरोगाची बाधा झाली. उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे मात्र एकाही क्षयबाधिताची नोंद नाही.
क्षयरोगाबाबत समाजात आजही गैरसमज आहेत. याच्या उपचारांसाठी डॉट्स प्लस केंद्रात जावे लागते. पण बालकाला तेथे नेले आणि ही माहिती नातेवाइकांना समजल्यास ते वाळीत टाकतील, ही भीती कुटबांला असते. ग्रामीण भागात औषधोपचार मोफत असले तरी बालकास प्रथिनयुक्त पदार्थ देणे आर्थिक कारणास्तव अनेकांना शक्य नसते. शहरात झोपडपट्टी परिसरातील कोंदट वातावरण क्षयास कारणीभूत ठरते.

...तर क्षयरोगावर नियंत्रण शक्य
क्षयरुग्णांच्या एकूण प्रमाणापैकी १० टक्के आजार लहानग्यांमध्ये दिसून येतो. या आजाराचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका असतो. आईला किंवा घरातील सदस्याला क्षय झाला असेल तर त्याची बाधा बालकाला होऊ शकते. नवजात बालकांत क्षयरोग रक्ताचा किंवा मेंदूच्या आवरणाला होतो. या बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने तो आणखी वाढतो. या स्थितीत बालकांना केवळ स्तनपानासाठी आईजवळ ठेवले पाहिजे. वेळीच बीसीजी इंजेक्शन दिले पाहिजे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप, सतत खोकला, वजन वाढणे किंवा स्थिर राहणे तसेच घरातील सदस्यांना क्षयरोग नसल्याची खात्री करणे आदी बाबी वेळीच तपासाव्यात. जेणेकरून क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
- डॉ. राजेंद्र ननावरे, सल्लागार इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट टुबर्क्यलोसिस अ‍ॅॅण्ड लंग डिझीस

काही प्रमुख लक्षणे
शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरच हा रोग होणे किंवा न होणे अवलंबून असते. ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे, दम लागणे आदी या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. क्षयाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू केल्यास तो सहा महिन्यांत बरा होतो, तर कधी नऊ ते बारा महिने उपचार घ्यावे लागतात.

Web Title: The most damaged babies born in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई