मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण-चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:07 AM2018-07-22T04:07:38+5:302018-07-22T04:08:24+5:30
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मुंबई : मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच उर्वरीत मागण्यांसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पाटील म्हणाले, मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे काढून लक्ष वेधले. सगळ््या जगाला आदर्श होईल, अशा पद्धतीने हे मोर्चे काढून त्यांनी सरकारसमोर मागण्या ठेवल्या. त्यांचा विचार करत सरकारने वेळोवेळी निर्णय घेत मागण्या मान्य केल्या. शिष्यवृत्ती, वसतिगृहांमधील सवलत, नोकरी तसेच शिक्षणात आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. न्यायालयातही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे.
नुकतीच विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकरभरतीत देखील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. मराठा समाजाच्या मागणीसाठी उपसमितीची देखील नेमणूक केली असून स्वत: मी अध्यक्ष या नात्याने त्याचे कामकाज अत्यंत जलदगतीने व वेगाने होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असेही त्यांनी सांगितले.