Join us

उत्तरप्रदेश, बिहारसाठी सोडल्या सर्वाधिक श्रमिक विशेष ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 7:08 PM

रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील मजूर, कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरु केली आहे.

 

मुंबई : रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील मजूर, कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरु केली आहे. या श्रमिक ट्रेन सर्वाधिक उत्तरप्रदेशला जात आहेत. तर, याखालोखाल या ट्रेन बिहारला जात आहेत. बुधवारपर्यंत संपूर्ण देशभरात ६४२ श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. यापैकी उत्तरप्रदेशात ३०१ श्रमिक विशेष ट्रेन, बिहारला १६९  श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. 

 लॉकडाउनमध्ये देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाकडून कामगार दिनी म्हणजे १ मे रोजी पासून  श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात येत आहेत. १३ मेपर्यंत संपूर्ण देशात ६४२ श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. त्यामधून ७ लाख ९० हजार मजुरांनी  प्रवास केला. या मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले.  प्रवासादरम्यान मजुरांना जेवण आणि पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. श्रमिक विशेष ट्रेनमध्ये १ हजार २०० प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा होती. परंतु त्यामध्ये वाढ करण्यात आली असून सुमारे १७०० प्रवासी एका ट्रेनमधून प्रवास करु शकतात. श्रमिक ट्रेनसाठी स्लीपर क्लास कोचची ट्रेन धावत असून त्यामधील मधील सीट काढण्यात आलेली आहे.  बुधवारपर्यंत चालविण्यात आलेल्या ६४२  ट्रेनपैकी 

उत्तरप्रदेशमध्ये ३०१ आणि बिहारमध्ये १६९ ट्रेन धावल्या. याखालोखाल मध्य प्रदेश ५३,  झारखंड ४०,  ओडिशा ३८,  राजस्थान ८,  पश्चिम बंगाल ७, छतीसगड ६, उत्तराखंड ४,  जम्मू काश्मीर ३, आंध्रप्रदेश ३, महाराष्ट्र ३, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक १ तामिळनाडू १, मिझोराम १, तेलंगणा १ , त्रिपुरा १, मणिपूर १, श्रमिक विशेष ट्रेन धावल्या आहेत.

 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस