Join us

सर्वाधिक महाविद्यालये उ. प्रदेश, महाराष्ट्रात पण..., लोकसंख्येच्या तुलनेत छोटी राज्ये पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:04 PM

Education News: देशात सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर असली तरी लोकसंख्येचा विचार करता तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक आदी राज्यांमध्ये महाविद्यालये अधिक आहेत.

मुंबई : देशात सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर असली तरी लोकसंख्येचा विचार करता तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक आदी राज्यांमध्ये महाविद्यालये अधिक आहेत.

केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२चा ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’ (एआयएसएचई) नुकताच जाहीर झाला. त्यानुसार देशात सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात आहेत. त्या खालोखाल कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक महाविद्यालयांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ८,३७५ महाविद्यालये आहेत. गेल्या वर्षी हा आकडा ८,११४ होता. त्या खालोखाल महाराष्ट्रात ४,६९२ आणि कर्नाटकात ४,४३० महाविद्यालये आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत विचार करता उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या कमी आहे. उत्तर प्रदेशात एक लाख लोकसंख्येमागे केवळ २९, तर महाराष्ट्रात ३६ महाविद्यालये आहेत.

लोकसंख्येनुसार सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केरळ (४६), हिमाचल प्रदेश (४७), आंध्र प्रदेश (४९), कर्नाटक (६६), तेलंगणा (५२) आणि पुडुचेरी (५३) यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात एकूण १,१६८ विद्यापीठे, विद्यापीठ स्तरावरील संस्था ४५,४७३ महाविद्यालये आणि १२ हजार डिप्लोमासारखे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी नोंदणीचा अभ्यास करण्यात आला.

१९ लाख विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातभारतात उच्च शिक्षणातील एकूण विद्यार्थी नोंदणीत १९ लाख विद्यार्थ्यांची भर पडली आहे. २०२०-२१ मध्ये भारतात ४.१४ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते. वर्षभरात हा आकडा ४.३३ कोटींवर गेला आहे. गेल्या सात वर्षांत एकूण विद्यार्थी नोंदणीत ९१ लाख (२६.५ टक्के वाढ) विद्यार्थ्यांची भर पडली आहे. २०१४-१५ मध्ये हा आक़डा ३.४२ कोटी होता. 

टॅग्स :महाविद्यालयशिक्षण क्षेत्र