पड रे पाण्या... कर पाणी पाणी!; महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच
By सचिन लुंगसे | Published: July 14, 2024 08:59 AM2024-07-14T08:59:28+5:302024-07-14T09:00:44+5:30
सोलापूर जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई : मोसमी पावसाचे राज्यात आगमन होऊन आता महिना झाला. राज्यभरात ठिकठिकाणी चांगल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात असा पाऊस कोकण वगळता फार कुठे पडलेला नाही. उलटपक्षी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
केवळ सोलापूर जिल्ह्यात ६० % हून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील १ जूनपासून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, जालना, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, परभणी, लातूर, बीड, अहमदनगर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत २० ते ५९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाले आहे. तर उवरित जिल्हे आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जून महिन्याची मासिक सरासरी कमी तर जुलैची अधिक असते. जुलैचे अजून १८ दिवस बाकी आहेत. आणि सहसा जुलैच्या शेवटच्या २ आठवड्यांत अधिक पाऊस असतो. आता महाराष्ट्रासाठी यावर्षी १ जून ते १० जुलैदरम्यानच्या ४० दिवसांत हवामान खात्याने सांगितलेली १२% अधिक पावसाची टक्केवारी बरोबर असून असमान वितरणातून झालेला पाऊस शेतकऱ्यांना कमी वाटतो. त्यामुळे दोघेही बरोबर आहेत - माणिकराव खुळे, ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ