Join us  

फुले योजनेतून सर्वाधिक हृदयविकारावर उपचार; जे. जे. रुग्णलयाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 2:18 PM

या रुग्णालयात राज्यातील विविध भागांतून रुग्ण उपचाराकरिता येतात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या वर्षभरात मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर जे.जे. रुग्णालयात  महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून वर्षभरात सर्वाधिक उपचार हृदयविकाराच्या रुग्णांवर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या रुग्णालयात राज्यातील विविध भागांतून रुग्ण उपचाराकरिता येतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून  गरीब घरातील रुग्णांना मुंबईत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जे.जे. रुग्णालय हक्काचे ठिकाण वाटते. त्यामध्ये विशेष म्हणजे हृदयविकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे योजनेतील आकडेवारीरून स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील रुग्णांना वैद्यकीय उपचार मोफत दरात मिळावेत, याकरिता ही सुविधा २०१२ पासून सुरू झाली आहे. राज्यातील सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांत ही योजना असून काही प्रमाणात खासगी रुग्णालयांतही योजना सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरीब रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होतात. सरकारच्या अशा योजनांमुळे गरिबांची होणारी लूट थांबली असून योजनेचा राज्यात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड 
  • आधारकार्ड 
  • वार्षिक उत्पनाचा दाखला (१ लाखापर्यंत)
  • डॉक्टरांचे आजाराविषयी पत्र 
  • डॉक्टरांनी आजारासाठी दिलेला खर्च अहवाल

रुग्ण    विभाग

  • २८२१     हृदयविकार
  • ११५६     न्यूरोसर्जरी
  • ९१९     ऑर्थोपेडिक
  • ७१८     रेडिओलॉजी
  • ६५९     नेत्ररोग
  • ३८४     जनरल सर्जरी  
  • ३६१     न्युरोलॉजी  
  • २९४     नेफ्रॉलॉजी  
  • २७६     बालरोग  
  • २४२    कान-नाक-घसा

जे.जे. रुग्णालयात केवळ मुंबईतून नव्हे, तर राज्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. सरकारच्या आरोग्यासाठी ज्या योजना असतात त्याचा लाभ रुग्णांना त्यांच्या उपचारकारिता देण्यात येतो. यासाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष असून, रुग्णांना या योजनेसाठी जी मदत लागते, ती या कक्षाद्वारे केली जाते. अधिकाधिक रुग्णांना लाभ देण्यासाठी हा कक्ष काम करीत असतो. रुग्णाची या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सरकारी कागदपत्रे लागतात. त्याआधारे त्यांना दीड लाखापर्यंतचे सर्व उपचार रुग्णांना देण्यात येतात. सर्वसाधारण १२१२ आजारांवर या योजनेतून पात्रताधारक रुग्णांना मदत केली जाते. -डॉ. रेवत कनिंदे, समन्वयक, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, सर जे.जे. रुग्णालय

टॅग्स :जे. जे. रुग्णालय